Thu, Jun 24, 2021 12:16
वॉर्ड बॉयचा कोरोना रुग्णाची ऑक्सिजन पाईप काढून जीवे मारण्याचा प्रयत्न 

Last Updated: May 11 2021 10:18PM

मध्य प्रदेश : पुढारी ऑनलाईन

मध्य प्रदेशमधील ग्वाल्हेरमधील जिल्हा रुग्णालयात माणुसकीला काळिमा फासणारी घटना घडली आहे. रुग्णालयात एका कोरोनाग्रस्त महिलेचा ऑक्सिजन पाईप काढून तिला जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. हा प्रकार घडताना कोरानाग्रस्त महिलेच्या मुलाने पाहिले, त्याच वेळी ऑक्सिजन पाईप काढणाऱ्यांना त्याने पकडण्याचा प्रयत्न केला असता ते दोघे आरोपी धक्का देऊन पळून गेले. या घटनेनंतर डॉक्टरांनी ऑक्सिजन पाईप पुन्हा लावली. या घटनेचा पोलिस तपास करत आहेत.

देशातील कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे आरोग्य व्यवस्थेवर मोठा ताण पडत आहे. अनेकांना वेळेवर उपचार मिळत नसल्याचे चित्र आहे. ऑक्सिजन, रेमडेसिविर अभावी अनेक रुग्णांना प्राण गमवावे लागत आहेत. अशा भयावक परिस्थितीत माणसुकी जिवंत असल्याची अनेक उदाहरणे पाहायला मिळत आहेत. अशातच माणुसकीला काळिमा फासणारी एक घटना घडली आहे. 

ग्वाल्हेरमधील जिल्हा रुग्णालयात एका कोरोनाग्रस्त महिलेचा ऑक्सिजन पाईप काढून तिला मारण्याचा प्रयत्न केला आहे. गुढा परिसरात राहणाऱ्या पूनम वीरे या काही दिवसांपासून आजारी असल्यामुळे त्यांची कोरोना चाचणी करण्यात आली होती. त्यांच्या चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला. कोरोना संक्रमणामुळे त्यांच्या किडनी आणि यकृतावर परिणाम झाला होता. यानंतर डॉक्टरांनी पूनम यांची प्रकृती गंभीर असून त्या काही दिवसच जिवंत राहू शकतील, असे सांगितले होते. त्यांचा मुलगा दीपकने त्यांना मुरार जिल्हा रुग्णालयाच्या कोविड वॉर्डमध्ये दाखल केले. 

दीपक हा त्याच्या आईची काळजी घेण्यासाठी स्वत: रुग्णालय परिसरात थांबलेला होता. रविवारी रात्री दीपक लघुशंकेला जात होता. त्यादरम्यान दोन वॉर्डबॉय (राहुल आणि सोनू) रुग्णालयाच्या वॉर्डमध्ये होते. रुग्णालयातील हे दोन वॉर्ड बॉय आईला लावण्यात आलेला ऑक्सिजन पाईप काढताना दीपकला दिसले. यानंतर लगेचच दीपकने आरडाओरडा सुरू केला व त्या दोघांना पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र ते दोघे तिथून पळून गेले. या घटनेनंतर डॉक्टर तेथे आले त्यांनी दिपकच्या आईला ऑक्सिजन पाईप पुन्हा लावली. या घटनेनंतर त्या दोघांचा शोध पोलिस घेत आहे.