Sun, May 26, 2019 14:47होमपेज › National › तामिळनाडू : पलानीस्‍वामी सरकारला तुर्तास अभय

तामिळनाडू : पलानीस्‍वामी सरकारला तुर्तास अभय

Published On: Jun 14 2018 2:54PM | Last Updated: Jun 14 2018 2:53PMचेन्‍नई : पुढारी ऑनलाईन

तामिळनाडूतील १८ आमदारांच्या विधानसभा सदस्यत्‍व रद्दप्रकरणी पाच महिन्यानंतर मद्रास उच्‍च न्यायालयाने निकाल दिला. या प्रकरणी दोन न्यायाधीशांच्या पीठापुढे झालेल्या सुनावणीत दोघांनी वेगवेगळा निर्णय दिला. त्यामुळे तुर्तास पलास्‍वामी सरकारला अभय मिळाले आहे. 

उच्‍च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांनी सभापतींनी १८ आमदारांचे सदस्यत्‍व रद्द केल्याच्या बाजूने निकाल दिला. तर दुसरे न्यायमूर्ती सुंदर यांनी सदस्यत्‍व रद्द करण्याच्या विरोधात निर्णय दिला. त्यामुळे आता हे प्रकरण तीन न्यायाधीशांच्या खंडपीठापुढे सुनावणीसाठी जाणार आहे. त्यामुळे सध्यातरी राज्य सरकार कोसळण्याची शक्यता टळली आहे. 

दरम्यान, मुख्यमंत्री पलानीस्‍वामी यांनी निकालाच्या पार्श्‍वभूमीवर विविध शक्यतांचा आढावा घेण्यासाठी सहकारी मंत्र्यांची बैठक बोलावली होती. न्यायालयाने जर १८ आमदारांचे सदस्यत्‍व रद्द करण्याच्या बाजूने निकाल दिला असता तर सरकारला धोका होता. पलानीस्‍वामी सरकारला बहुमत चाचणीला सामोरे जावे लागले असते. यात सरकार कोसळण्याचाही धोका होता. 

या निकालानंतर टीटीव्‍ही दिनकरन, लोकविरोधी सरकारला न्यायालयाने आणखी काही महिन्यांसाठी वाचवले आहे, असे म्‍हणाले. १८ सप्‍टेंबर २०१७ रोजी तामिळनाडू विधानसभेचे अध्यक्ष पी. धनपाल यांनी अण्‍णाद्रमुकच्या १८ आमदारांचे निलंबन केले होते. या आमदारांनी एकत्र येत राज्यपालांची भेट घेऊन पलानीस्‍वामी सरकारवर अविश्वास दाखवला होता.