Fri, Apr 03, 2020 23:35होमपेज › National › देशात कोरोनाने दोघांचा मृत्यू; बळींची संख्या १२

देशात कोरोनाने दोघांचा मृत्यू; बळींची संख्या १२

Last Updated: Mar 25 2020 10:51PM
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
राज्य सरकारांनी जारी केलेल्या आकडेवारीनुसार बुधवारी देशभरातील कोरोना संक्रमितांची संख्या बुधवारी 623 वर पोहोचली आहे. आजअखेर 12 जणांचा मृत्यू या आजाराने झाला आहे. बुधवारी 87 नवे रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. उज्जैन व मदुराईमध्ये प्रत्येकी एक अशा दोन जणांचा बळी या आजाराने घेतला आहे. ईशान्येकडील राज्यांमध्ये पहिल्यांदाच मिझोराममध्ये एक रुग्ण आढळला आहे.

नेदरलँडमधून परतलेल्या चर्चमधील एका फादरचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. मिझोराममध्ये रुग्ण आढळल्यानंतर कोरोना संक्रमित राज्यांची देशातील संख्या 25 वर पोहोचली आहे. तामिळनाडूतील मदुराई येथे 54 वर्षीय रुग्णाने उपचारादरम्यान बुधवारी सकाळी अखेरचा श्‍वास घेतला. संध्याकाळी मध्य प्रदेशातील उज्जैनमध्ये एका 65 वर्षीय महिलेचा कोरोनाने मृत्यू झाला.
आजअखेर कोरोनाचे सर्वाधिक 122 संक्रमित महाराष्ट्रात आढळले असून, केरळ 109 बाधितांसह दुसर्‍या क्रमांकावर आहे.

मदुराईतील मृताबद्दल माहिती देताना तामिळनाडूचे आरोग्यमंत्री सी. विजय भास्कर यांनी सांगितले की, रुग्ण आधीपासून मधुमेह व रक्‍तदाबाने ग्रस्त होता. याआधी मंगळवारी महाराष्ट्रात एका संक्रमिताचा मृत्यू झाला होता. आजवरच्या 12 मृतांपैकी 8 जणांना मधुमेहाचा किवा रक्‍तदाबाचा आजार होता.

सोमवारी पश्‍चिम बंगालमध्ये एका 57 वर्षीय तिबेटियन व्यक्‍तीचा मृत्यू झाला होता. याच दिवशी पाटण्यात 38 वर्षीय युवकाचा मृत्यू झाला होता. सैफ नावाच्या या युवकालाही आधीच मधुमेह होता. नंतर मुंबईत एका 63 वर्षीय व्यक्‍तीचा मृत्यू झाला. ही व्यक्‍ती रक्‍तदाबाने ग्रस्त होती.