Fri, Oct 30, 2020 18:39होमपेज › National › कोरोनातून जगाला बाहेर काढण्याचा प्रयत्न करू : पंतप्रधान नरेंद्र मोदी

कोरोनातून जगाला बाहेर काढण्याचा प्रयत्न करू : पंतप्रधान नरेंद्र मोदी

Last Updated: Sep 27 2020 1:49AM
नवी दिल्ली/न्यूयॉर्क : पीटीआय

कोरोना संकटात भारताने 150 हून अधिक देशांना औषधांचा पुरवठा केला आहे. जगातील सर्वात मोठा लस उत्पादक देश या नात्याने जगाला या महामारीतून बाहेर काढण्यासाठी भारताची लस उत्पादन आणि वितरण क्षमता कामी येईल, असा विश्‍वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी व्यक्‍त केला. 

संयुक्‍त राष्ट्र सुरक्षा परिषदेतील स्थायी सदस्यत्वासाठी भारताची दावेदारी स्पष्ट करताना जेव्हा आम्ही मजबूत होतो तेव्हा कोणाला त्रास दिला नाही, जेव्हा विवश होतो, तेव्हा कोणावर ओझे झालो नाही, असे सूचक विधानही त्यांनी संयुक्‍त राष्ट्रांच्या महासभेला संबोधित करताना केले.

आपल्या 22 मिनिटांच्या भाषणात पंतप्रधान मोदींनी विविध मुद्द्यांवर भाष्य केले. संयुक्‍त राष्ट्रांत निर्णय घेण्याच्या व्यवस्थेपासून भारताला अखेर कधीपर्यंत दूर राहावे लागेल, असा प्रश्‍न उपस्थित करीत ते म्हणाले की, 1945 मधील जग आजच्यापेक्षा वेगळे होते. जगाच्या कल्याणहेतूने तेव्हा या संस्थेची स्थापना झाली. तीही कालानुरूप होती. मात्र आता 21 व्या शतकातील गरजा आणि आव्हाने वेगळी आहेत. त्या वेळी स्थापन झालेली ही संस्था आजही तितकीच प्रासंगिक आहे का, असा प्रश्‍न जागतिक समुदायासमोर असून, सर्व काही बदलले आणि आपण बदललो नाही, तर बदल घडवून आणण्याची शक्‍ती क्षीण होते. 

तिसरे महायुद्ध झाले नसले, तरी अनेक गृहयुद्धे झाली, रक्‍तपात झाला.  लाखो बळी गेले. अशात संयुक्‍त राष्ट्राचे प्रयत्न पुरेसे होते का? गेल्या 8-9 महिन्यांपासून जग कोरोनाविरोधात लढत आहे. मात्र या लढ्यात संयुक्‍त राष्ट्र कुठे आहे, असा सवालही मोदींनी उपस्थित केला. 

कोणाशी मैत्री म्हणजे दुसर्‍याला विरोध नव्हे

भारताने नेहमी जागतिक कल्याणाला आपले प्राधान्य दिले आहे. देशाची धोरणेही याने प्रेरित असतात. एखाद्या देशासोबत मैत्रीचा हात पुढे केला म्हणजे तो दुसर्‍या देशाला विरोध असे नव्हे. एका देशाशी द्विपक्षी संबंध मजबूत करताना दुसर्‍या सहकारी देशाला कमजोर करण्याचा हेतू त्यामागे मुळीच नसतो, असेही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या वेळी स्पष्ट केले.

 "