Wed, Sep 23, 2020 01:25होमपेज › National › आजपासून बदलले 'हे' नियम, सर्वसामान्यांच्या खिशावर होणार परिणाम 

आजपासून बदलले 'हे' नियम, सर्वसामान्यांच्या खिशावर होणार परिणाम 

Last Updated: Jul 01 2020 12:40PM

संग्रहित छायाचित्रनवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन 

एकीकडे देशात कोरोनाचा कहर कायम आहे. यादरम्यान, आज १ जुलैपासून काही नियम बदलले आहेत. १ जुलैपासून अनलॉक-२ प्रक्रिया सुरू झाली आहे. ३० जूनला अनलॉक-१ संपुष्टात आले आहे. काही बदल असे आहेत, ज्यामुळे याचा परिणाम थेट लोकांच्या खिशावर पडणार आहे. उदाहरणार्थ, गॅसच्या किमती बदलू शकतात, एटीएम संबंधित बदल होऊ शकतात आणि मिनिमम अकाउंट बॅलेन्सचे नियमदेखील बदलू शकतात.

१ एटीएममधून पैसे काढण्यास मर्यादा येणार 

अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी मार्च महिन्यात कोरोना महामारीमुळे कोणत्याही एटीएममधून पैसे काढण्यासाठी सवलत (ATM money withdrawal rule) दिली होती. ही सवलत त्यांनी ३ महिन्यांसाठी दिली होती. ३० जूनला ही सूट संपुष्टात आली. या सूटअंतर्गत ग्राहक कोणत्याही बँकेच्या एटीएममधून कितीही वेळा पैसे काढू शकत होते. त्यावर कुठलाही अतिरिक्त चार्ज लागत नव्हता. आता एटीएममधून पैसे काढण्यावर मर्यादा येणार आहेत. एका निश्चित सीमेपेक्षा अधिक वेळा एटीएममधून पैसे काढल्यास प्रति ट्रान्जॅक्शन २० रुपये अतिरिक्त चार्ज लागेल. 

२- मिनिमम बॅलेन्सशी संबंधित नियम बदलले

कोरोना महामारीमुळे निर्मला सीतारमण यांनी जाहिर केले होते की, कोणालाही ३० जूनपर्यंत मिनीमम बॅलेन्स (Minimum balance) ठेवण्याची अनिवार्यता नसेल. आता ही सवलत संपुष्टात आली आहे. ग्राहकांच्या खात्यामध्ये मिनिमम बॅलेन्स ठेवण्यासाठी काही बँकांकडून सांगितले जाते. खात्यात अत्यल्प शुल्क असल्यास दंड आकारला जातो. आता १ जुलैपासून पुन्हा मिनिमम बॅलेन्स ठेवण्याची व्यवस्था लागू केली जाईल.

३- घरगुती गॅसच्या किमती

तेल मार्केटिंग कंपन्या प्रत्येक महिन्याच्या पहिल्या तारखेला एलपीजी घरगुती गॅसच्या किंमतीमध्ये बदल करते. मागील काही महिन्यांपासून किमती वाढत आहेत. घरगुती गॅसच्या किमतीमध्ये वाढ होऊ शकते. 

४- म्यूचुअल फंड खरेदी केल्यावर स्टँप ड्यूटी

१ जुलैपासून म्युचुअल फंडशी संबंधित एक बदल झाला आहे. आता म्युचुअल फंड खरेदी केल्यास त्यावर स्टँप ड्यूटी द्यावी लागेल. म्हणजेच आपण SIP वा STP मध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर स्टँप ड्यूटी देण्यासाठी तयार राहा. नव्या नियमानुसार, म्युचुअल फंड खरेदी केल्यास एकूण गुंतवणुकीच्या ०.००५ टक्के स्टँप ड्यूटी द्यावी लागेल. 

५- नव्या कंपन्यांसाठी ऑनलाईन रजिस्ट्रेशन सोपे 

जर आपण कोणतीही नवी कंपनी उघडण्याची तयारी करत असाल तर १ जुलैनंतर आपल्यासाठी हे खूप सोपे होणार आहे. आपण घरी बसल्या केवळ आधार कार्डाद्वारे कंपनीचे रजिस्ट्रेशन करू शकता. कंपनीचे रजिस्ट्रेशन करण्यासाठी तमाम कागदपत्रे जमा करावे लागत होते. ज्यामुळे ही प्रक्रिया खूप कठीण होती. सरकारकडून यासंदर्भातील दिशा-निर्देश जारी करण्यात आले आहेत. 

६- अटल पेन्शन योजना इन्स्टॉलमेंट ऑटो डेबिट

असंघटित क्षेत्रातील १८ ते ४० वयोगटातील लोकांसाठी केंद्र सरकारची अटल पेन्शन योजना APY - Atal Pension Yojana) आहे. याअंतर्गत एप्रिल ते जून या कालावधीत नागरिकांच्या खात्यांमधून ऑटो डेबिट (Atal Pension Yojana auto debit) होत नव्हते. परंतु, ३० जूनला ही सवलत संपुष्टात आली आहे. १ जुलैपासून नागरिकांच्या खात्यांमधून अटल पेन्शन योजनेसाठी रक्कम कट होणार आहे म्हणजेच ऑटो डेबिट होतील. अशा परिस्थितीत आपल्या खात्यात इन्स्टॉलमेंटची रक्कम राहील, याकडे लक्ष ठेवा. 
 

 "