Fri, Dec 04, 2020 04:44होमपेज › National › टोमॅटो 70 ते 80 रुपये किलोच्या घरात 

टोमॅटो 70 ते 80 रुपये किलोच्या घरात 

Last Updated: Jul 10 2020 9:46PM

संग्रहित छायाचित्रनवी दिल्ली : पुढारी वृत्तसेवा 

देशातील जवळपास सर्वच मोठ्या शहरांमध्ये टोमॅटोचे भाव 60 ते 70 रुपये किलोपर्यंत पोहोचले आहेत. पावसाळी मोसमात टोमॅटो खराब होण्याची शक्यता अधिक असते. टोमॅटोची पुरवठा साखळी पूर्ववत होताच वधारलेले दर कमी होतील, असा विश्‍वास केंद्रीय अन्‍न व नागरी पुरवठामंत्री रामविलास पासवान यांनी व्यक्‍त केला आहे.

मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार चेन्‍नईसह इतर मेट्रो शहरांमध्ये टोमॅटोचे दर 60 रुपये किलोपर्यंत पोहोचले आहेत. महिन्याभरापूर्वी हे दर 20 रुपये किलो होते. देशातील काही भागांत टोमॅटोची 70 ते 80 रुपये किलो दराने विक्री केली जात आहे. गुरुग्राम, गंगटोक, सिलीगुडी तसेच रायपूरमध्ये टोमॅटो 70 रुपये किलो दराने विकले जात आहेत. सर्वसामान्य नागरिकांच्या खिशावर त्यामुळे अतिरिक्‍त बोजा पडत आहे. गोरखपूर, कोटा आणि दीमापूर मध्ये 80 रुपये किलोपर्यंत भाव वधारले आहे. आकडेवारीनुसार टोमॅटो उत्पादक राज्यातही टोमॅटो दराने उच्चांकी पातळी गाठली आहे. हैदराबादमध्ये दर 37 रुपये किलो, तर चेन्नईत 40 रुपये, बंगळुरूत 46 रुपये किलो दराने विक्री केली जात आहे.  

पुरवठा साखळीत सुधारणा झाल्यानंतर दर सामान्य स्तरावर येतील. टोमॅटोचा मोसम नसल्याने दर वाढले आहेत. जुलै ते सप्टेंबरदरम्यान टोमॅटोचे दर अधिक असतात. टोमॅटो नाशंवत असल्याने त्याच्या किमतीत अधिक चढ-उतार नोंदवला जातो, असे मत पासवान यांनी व्यक्‍त केले. 

गेली पाच वर्षे याच काळात टोमॅटोचे दर वाढतात. उत्तर प्रदेश, राजस्थान, झारखंड, पंजाब, तामिळनाडू, केरळ, जम्मू-काश्मीर तसेच अरुणाचल प्रदेशात टोमॅटोचे कमी उत्पादन घेतले जाते. टोमॅटोसाठी ते इतर उत्पादक राज्यांवर अवलंबून असतात. देशात वर्षभरात जवळपास 1 कोटी 97 लाख टन टोमॅटोचे उत्पादन होते. विक्री सुमारे 1 कोटी 15 लाख टनांची केली जाते.