तीन कोटींहून अधिक 'एन-९५' मास्कचा पुरवठा

Last Updated: Aug 13 2020 3:45PM
Responsive image


नवी दिल्ली : पुढारी वृत्तसेवा 

कोरोना महारोगराई विरोधातील युद्धात राज्य सरकारचे हात बळकट करण्यासाठी केंद्र सरकारकडून सर्वतोपरी मदत केली जात आहे. केंद्राकडून आतापर्यंत राज्य तसेच केंद्रशासित प्रदेशांना ३ कोटींहून अधिक एन-९५ मास्क, १.२८ कोटींहून अधिक वैयक्तिक सुरक्षा ​किट  (पीपीई), १० कोटींहून अधिक हायड्रोक्सीक्लोरोक्वीन गोळ्या तसेच २२ हजारांहून अधिक स्वदेशी बनावटीचे व्हेंटिलेटरचे नि:शुल्क वितरण करण्यात आल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आली आहे.

११ मार्च २०२० नंतर केंद्राने राज्य, केंद्रशासित प्रदेशांना ३.०४ कोटींहून अधिक एन-९५ मास्क, १.२८ कोटींहून अ​धिक पीपीई ​किट वितरित केल्या आहेत. सोबतच १०.८३ कोटींहून अधिक एचसीक्यू गोळ्या वितरित करण्यात आले आहेत. संपूर्ण स्वदेशी बनावटीचे २२ हजार ५३३ मेक इन इंडिया व्हेंटिलेटर विविध राज्य, केंद्रशासित प्रदेशांना देण्यात आले आहे. राज्यांकडून व्हेंटिलेटरच्या वापरासंबंधी काळजीही केंद्राकडून घेतली जात आहे.

कोरोनाचा सामना करण्यासाठी केंद्राकडून राज्यांना नि:शुल्क सर्व वैद्यकीय साहित्य पूरवले जात आहे. महारोगराईचा सुरुवातीच्या काळात ही सर्व उपकरणांचे उत्पादन देशांतर्गत होत नव्हते. कोरोना रोगराईचा जा​गतिक प्रभाव लक्षात घेता विदेशी बाजारातही या साहित्यांचा तुटवडा निर्माण झाला होता.

केंद्रीय आरोग्य मंत्रालय, वस्त्रोद्योग मंत्रालय, रसायन मंत्रालयाचा औषधनिर्माण विभाग, उद्योग तसेच व्यापार संवर्धन विभाग, संरक्षण शोध तसेच विकास विभागाच्या संयुक्त विद्यमाने आवश्यक वैद्यकीय उपकरणे पीपीई किट, एन-९५ मास्क, व्हेंटिलेटरचे उत्पादन तसेच पूरवठा करण्यासाठी देशांतर्गत उद्योगांना प्रोत्साहित करण्यात आले होते. परिणामस्वरूप आत्मनिर्भर भारत तसेच मेक इन इंडिया संकल्पनेला मजबूती मिळाली. केंद्राकडून राज्यांना पाठवण्यात आलेल्या साहित्यांपैकी बहुतेक साहित्य, उपकरणे देशातच बनवण्यात आले आहेत असे मंत्रालयाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.