Wed, Aug 12, 2020 09:32होमपेज › National › शाह फैसल पोलिसांच्या ताब्यात; नजरकैदेत ठेवले!

शाह फैसल पोलिसांच्या ताब्यात; नजरकैदेत ठेवले!

Published On: Aug 14 2019 3:41PM | Last Updated: Aug 14 2019 3:40PM

संग्रहित छायाचित्रनवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन

माजी आयएएस अधिकारी आणि जम्मू- काश्मीर पीपल्स मूव्हमेंटचे अध्यक्ष शाह फैसल यांना आज, बुधवारी पोलिसांनी दिल्ली विमानतळावर ताब्यात घेतले. शाह फैसल परदेशात जात होते. मात्र, त्याआधीच त्यांना सार्वजनिक सुरक्षा कायद्यातर्गंत (पीएसए) ताब्यात घेण्यात आले. त्यांना दिल्लीतून काश्मीरला परत पाठविण्यात आले आहे. फैसल यांना त्यांच्या घरात नजरकैदेत ठेवले आहे.

केंद्र सरकारने जम्मू-काश्मीरला विशेषाधिकार देणारे कलम ३७० रद्द केले. तेव्हापासून शाह सतत वादग्रस्त वक्तव्ये करत होते. त्यांनी आज काश्मीर प्रश्नी वादग्रस्त वक्तव्य केले. त्यांनी म्हटले आहे की, आमच्यासमोर दोन मार्ग आहेत. काश्मीरने कठपुतळी अथवा फुटीरतावादी बनावे. याशिवाय दुसरा पर्याय नाही. राजकीय अधिकार पुन्हा मिळवण्यासाठी काश्मीरला दीर्घकाळ चालणाऱ्या अहिंसक राजकीय आंदोलनाची गरज आहे.

शाह फैसल यांनी ईदच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर देखील निशाणा साधला होता. त्यांनी म्हटले होते की, काश्मीरमध्ये ईद नाही. काश्मीरमधील लोक आपली जमीन चुकीच्या पद्धतीने भारतात सामिल झाल्याने रडत आहेत. जोपर्यंत आम्हाला १९४७ पासून मिळालेला विशेष राज्याचा दर्जा परत मिळत नाही तोपर्यंत आमच्याकडे ईद साजरी केली जाणार नाही.