नवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन
नेताजी सुभाषचंद्र बोस यांची काल १२५ वी जयंती साजरी करण्यात आली. त्यानिमित्ताने देशभर विविध कार्यक्रम पार पडले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नेताजी बोस यांची जयंती पराक्रम दिवस म्हणून घोषित केला आहे. असे असले तरी एका घटनेवरून सोशल मीडियात चर्चा रंगली आहे.
नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंती दिनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी एका छायाचित्राचे अनावरण केले. हे छायाचित्र नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे नसून प्रसेनजीत चॅटर्जी या बंगाली अभिनेत्याचे असल्याची चर्चा सोशल मीडियावर सुरू आहे. प्रसेनजीत यांनी एका बंगाली चित्रपटात नेताजी बोस यांची भूमिका साकारली होती. ‘गुमनामी’ या नेताजींच्या जीवनावरील चित्रपटात त्यांनी नेताजींची भूमिका साकारली होती. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी काल अनावरण केलेले छायाचित्र हे नेताजींचे नसून प्रसेनजीत चॅटर्जी यांचे असल्याची चर्चा आहे. तरी राष्ट्रपती कार्यालयाकडून याबाबत अजूनपर्यंत कोणताही खुलासा करण्यात आलेला नाही.