Sun, Aug 09, 2020 02:44



होमपेज › National › प्रशांत किशोर यांच्‍यासोबत 'आप'चा अबकी बार ६७ पारचा नारा!

प्रशांत किशोर यांच्‍यासोबत 'आप'चा अबकी बार ६७ पारचा नारा!

Last Updated: Dec 14 2019 2:23PM

प्रशांत किशोर व अरविंद केजरीवाल



नवी दिल्‍ली : पुढारी ऑनलाईन 

दिल्‍लीत विधानसभा निवडणूक तोंडावर आल्‍या आहेत. दिल्‍ली विधानसभा निवडणुकीसाठी आता आम आदमी पक्षाने देखील कंबर कसली आहे. राजकीय रणनितीसाठी देशभरात 'राजकीय चाणक्य' म्हणून प्रसिद्ध असलेले प्रशांत किशोर हे आपसाठी काम करणार आहेत. दिल्‍लीचे मुख्‍यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी याची ट्वीट करत माहिती दिली. यासोबतच दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी केजरीवाल यांच्‍या ट्वीटला  रीट्वीट करत ‘अबकी बार ६७ पार’ हा नारा दिला आहे.

अरविंद केजरीवाल  यांनी ट्वीटमध्‍ये म्‍हटले आहे की, आय-पॅक आमच्यासोबत जोडली गेली असल्याचे सांगताना अत्यंत आनंद होतो आहे. तुमचे स्वागत आहे. आय-पॅक म्हणजेच इंडियन पॉलिटिकल अॅक्शन कमिटी होय. ही प्रशांत किशोर यांची संस्था आहे. या संस्थेकडून निवडणुकीचे नियोजन केले जाते. यापूर्वी प्रशांत किशोर यांनी  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठीही काम केले आहे. यासोबतच पंजाब विधानसभा निवडणुकीत प्रशांत किशोर यांनी काँग्रेससाठी काम केले होते. 

आय-पॅक कडून देखील आम आदमी पक्षासाठी काम करणार असल्‍याची माहिती दिली आहे. आय-पॅक कडून ट्विटरवर  अरविंद केजरीवाल यांना टॅग करत म्‍हटले आहे की, पंजाब निवडणूक निकालानंतर आमच्‍या लक्षात आले की आपण सर्वात तगडा विरोधी पक्ष आहात. ज्‍याचा पंजाबमध्‍ये आम्‍ही सामना केला आहे. तुमच्‍यासोबत काम करायला मिळणे ही आमच्‍यासाठी आनंदाची गोष्‍ट आहे. 

प्रशांत किशोर यांनी लोकसभा निवडणुकीत शिवसेनेसाठीही काम केले होते. त्यानंतरही ते शिवसेनेशी जोडलेले राहिले. त्यापूर्वी आंध्र प्रदेशात वायएसआर काँग्रेसचे नियोजन त्यांनी आखले होते. जगनमोहन रेड्डी यांना राज्यात मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार म्हणून प्रोजेक्ट करण्यापासून ते प्रचारापर्यंतचं नियोजन त्यांनी केले आहे. आंध्र प्रदेशात जगनमोहन रेड्डी हे स्पष्ट बहुमतासह निवडून आले.