Tue, Aug 04, 2020 14:04होमपेज › National › राजकीय आरक्षण रद्द करा : प्रकाश आंबेडकर

राजकीय आरक्षण रद्द करा : प्रकाश आंबेडकर

Last Updated: Jul 14 2020 5:01PM
भोपाळ : पुढारी ऑनलाईन 

वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी लोकसभा आणि विधानसभेतील अनुसूचित जाती आणि जमातींसाठी देण्यात येणारे राजकीय आरक्षण रद्द करण्याची मागणी केली. तसेच त्यांनी सध्याच्या घडीला कोणताही पक्ष हे राजकीय आरक्षण रद्द करण्यास धजावणार नाही. कारण व्होट बँकचे राजकारण संपले तर ते आपली सत्ता गमावतील अशी त्यांना भीती आहे. 

प्रकाश आंबेडकर यांनी सोमवारी एका वृत्तसंस्थेला मुलाखत दिली. त्यावेळी त्यांना घटनेत पहिल्यांदा १० वर्षाच्या आरक्षणाची तरतूद करण्यात आली होती याबाबत प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी त्यांनी 'घटनेसंदर्भात चुकीचा समज झाला आहे. १० वर्षाच्या आरक्षणाची तरतूद ही फक्त राजकीय आरक्षणाबाबत करण्यात आली होती. ते अनुसूचित जाती आणि जमातींसाठी मतदारसंघ (लोकसभा आणि इतर सभागृह) आरक्षित करण्यासाठी होते. बाबासाहेबांनी १९५४ मध्ये सांगितले होते की आता त्याची गरज नाही ही तरतूद काढून टाकली पाहिजे, असे सांगितले. 

ते पुढे म्हणाले, लोकांना मतदान हा त्यांचा अधिकार आहे हे आता समजले आहे. आता ते जरी मतदार संघ आरक्षित असला किंवा खुला असला तरी या अधिकाराचा वापर करतीलच. त्यांना आता या गोष्टीचा फरक पडत नाही. त्यामुळे राजकीय आरक्षणाचा हेतू साध्य झाला आहे. 

आंबेडकरांनी म्हणाले, अनेक आंबेडकरी विचारवंत राजकीय आरक्षण रद्द करण्यात यावे असे मत मांडत आहेत. पण, भाजप असू दे किंवा काँग्रेस कोणाकडेही एवढे धाडस नाही, असे वक्तव्य केले. त्यांना चांगली परिस्थिती असलेले लोकही आरक्षणाचा फायदा घेत आहेत याबाबत विचारले असता त्यांनी 'मी कोणत्याही आरक्षणाचा फायदा घेतलेला नाही, मी खुल्या मतदार संघातून विजयी झालो होतो.' असे उत्तर दिले. तसेच त्यांनी सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्र हे कलम १६ अन्वये मुलभूत अधिकारात येतात. जोपर्यंत हे मुलभूत अधिकार अस्तित्वात आहेत तोपर्यंत आरक्षण सुरू राहणार असे ही सांगितले. याचबरोबर त्यांनी आरक्षणात आरक्षण देण्याची तरतूद केली पाहिजे जेणेकरून जास्तीजास्त लोकांना आरक्षणचा फायदा मिळेल. 

आरक्षण या मुद्यावर अधिक बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाले की, आरक्षणात आरक्षण म्हणजे काय, गरीबातील गरीब व्यक्तीला सहजरित्या फायदा होईल. आम्ही जर सत्तेत आलो तर आम्ही एक शिडीसारखी पद्धती तयार करू त्यात ज्यांना आरक्षणाचा फायदा मिळालेला नाही त्यांना पहिल्यांदा संधी दिली जाईल आणि त्यांनतर ज्यांना आरक्षण दिले आहे त्यांना शेवटी संधी मिळेल.' 

याचबरोबर प्रकाश आंबेडकरांनी वंचित बहुजन आघाडी मध्यप्रदेशातील सर्व २५ जागांवार पोटनिवडणुका लढवणार असल्याची घोषणा केली.