Wed, Jan 20, 2021 21:10
पंतप्रधान फसल बिमा योजनेला पाच वर्ष पूर्ण

Last Updated: Jan 13 2021 2:27PM
नवी दिल्ली : पुढारी वृत्तसेवा

अस्मानी संकटातून शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारने सुरु केलेल्या प्रधानमंत्री फसल बिमा योजनेला (पीएमएफबीव्हाय) पाच वर्ष पूर्ण झाली आहेत. (pradhan mantri fasal bima yojana) अशात शेतकरी तसेच विविध राज्यांना या योजनेअंतर्गत करण्यात आलेल्या मदतीचा लेखाजोखा केंद्राकडून देण्यात आला. योजनेमुळे शेतकऱ्यांना अत्यंत किमान तसेच देशभरात एकाच अशा हप्त्याने व्यापक पीक सुरक्षा मिळाली, असा दावा कृषी मंत्रालयाकडून करण्यात आला आहे.

पीएमएफबीव्हाय अंतर्गत महाराष्ट्रात आलेल्या अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना ५ हजार  कोटी रुपयांची नुकसान भरपाई देण्यात आली. या योजनेअंतर्गत, दरवर्षी ५.५ कोटी पेक्षा जास्त शेतकऱ्यांना विमा कवच दिले जाते. आतापर्यंत या योजनेअंतर्गत ९० हजार कोटी रुपयांची नुकसान भरपाई देण्यात आली आहे. 

आधारमुळे ही मदत त्वरित शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होऊ शकते. कोरोना काळात ७० लाख शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळाला तसेच ८ हजार ७४१ कोटी रुपयांपर्यंतच्या दाव्यांच्या रकमा लाभार्थ्यांच्या खात्यात थेट जमा करण्यात आल्या असल्याचे मंत्रालयाकडून सांगण्यात आले आहे.

कष्टकरी शेतकऱ्यांना संरक्षण

कष्टकरी शेतकरी वर्गाला निसर्गाच्या लहरीपासून संरक्षण देण्यासाठी महत्वपूर्ण पाऊल उचलल्याला आज ५ वर्षे झाली आहेत. या योजनेमुळे विम्याची व्याप्ती वाढवली गेली, जोखीम कमी झाली आणि त्यामुळे कोट्यवधी शेतकऱ्यांना लाभ मिळाला. या योजनेच्या सर्व लाभार्थींचे अभिनंदन, अशी भावना पंतप्रधानांनी बुधवारी ट्विटरवरून व्यक्त केली. (pradhan mantri fasal bima yojana completed five years)