Mon, Sep 21, 2020 11:57होमपेज › National › कृषी विकासासाठी एक लाख कोटीचा निधी जाहीर, पंतप्रधानांची घोषणा

कृषी विकासासाठी एक लाख कोटीचा निधी जाहीर, पंतप्रधानांची घोषणा

Last Updated: Aug 09 2020 11:59AM
नवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन

कृषी क्षेत्रातील पायाभूत सुविधांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी एक लाख कोटींच्या निधीची घोषणा रविवारी केली. याचवेळी पंतप्रधान किसान योजनेच्या सहाव्या हप्त्यापोटी १७ हजार कोटी रुपये दिले गेले आहेत, असे पंतप्रधानांनी सांगितले. केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंग तोमर हेदेखील यावेळी उपस्थित होते. 

हा कार्यक्रम व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे आयोजित करण्यात आला. यात लाखो शेतकरी, सहकारी संस्था आणि नागरिक सहभागी झाले होते. साडेआठ कोटी शेतकर्‍यांना पंतप्रधान किसान योजनेचा सहावा हप्ता देण्यात आला असून त्यासाठी १७ हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आल्याचे आज कार्यक्रमात सांगण्यात आले. 

एक लाख कोटी रुपयांतून पिकांच्या काढणीनंतरच्या प्रक्रिया करण्यासाठी पायाभूत सुविधा उभारण्याचा सरकारचा उद्देश आहे. त्यात पीक साठवण केंद्रे, शीतगृहे, प्रक्रिया केंद्रे इत्यादीचा समावेश आहे. या सुविधांमुळे शेतीमालाला चांगला भाव मिळेलच; पण अन्नधान्य वाया जाण्याचे प्रमाणही कमी करता येईल. या प्रकल्पांसाठी लाभार्थ्यांना तीन टक्के व्याज दराचा सरकारकडून परतावा दिला जाईल आणि दोन कोटी रुपयांपर्यंतची पतहमी दिली जाईल. शेतकरी, सहकारी विपणन संस्था, विविध कार्यकारी सोसायट्या, स्थानिक स्वराज्य संस्था आदींना या योजनेचा लाभ घेता येईल.

 "