Sun, Aug 09, 2020 02:52होमपेज › National › काश्मिरी जनता आपलं ऐकणार का? पीएम मोदी म्हणाले... 

काश्मिरी जनता आपलं ऐकणार का? पीएम मोदी म्हणाले... 

Published On: Aug 14 2019 10:22AM | Last Updated: Aug 14 2019 10:22AM

संग्रहित छायाचित्रनवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन

जम्मू आणि काश्मीरला विशेषाधिकार देणारे अत्यंत वादग्रस्त कलम ३७० हद्दपार करण्यात आल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांवर प्रखर हल्ला चढवला. काही राजकीय कुटुंब आणि दहशतवाद्यांना सहानूभूती देणारेच कलम ३७० च्या हद्दपारीला विरोध करत आहेत असा घणाघात पीएम मोदी यांनी विरोधकांवर केला. 

वृत्तसंस्था IANS ला दिलेल्या मुलाखतीमध्ये कलम ३७० च्या हद्दपारीवर त्यांनी विस्तृत भाष्य केले. ते म्हणाले, ज्या लोकांनी कलम हटविण्यावरून विरोध केला, त्यामध्ये स्वार्थी समूह, राजकीय कुटुंब जे दहशतवाद्यांशी सहानूभुती दाखवणारे आहेत आणि विरोधी पक्षातील काही लोक आहेत. 

काश्मिरी जनता आपले ऐकणार का? या प्रश्नावर मोदी म्हणाले, की काश्मीरमधील परिस्थिती लवकरच सामान्य होईल. कलम ३७० मुळे देशातील लोकांचे नुकसान झाले. यामुळे काही परिवारांचा फायदा झाला. त्यामुळे गेल्या सात दशकात लोकांच्या अपेक्षा पूर्ण होऊ शकल्या नाहीत. आता त्यांना विकासाच्या प्रवाहात आणण्याची गरज निर्माण झाली आहे. 

ते म्हणाले, मी जम्मू-काश्मीरच्या लोकांना आश्वासन देऊ इच्छित आहे, की स्थानिकांच्या मनोकामना, स्वप्ने आणि महत्त्वकांक्षेला अनुसरून विकास केला जाईल. कलम ३७० आणि ३५ अ हे एकप्रकारे साखळदंडाप्रमाणे होते. त्यामध्ये ते अडकून पडले होते, पण आता तो साखळदंड निखळून पडला आहे. 

पीएम मोदी यांनी काश्मीरमधून कलम ३७० हद्दपार करून जम्मू आणि काश्मीर तसेच लडाखला केंद्रशासित प्रदेश करण्याचे समर्थन केले. हा निर्णय राष्ट्रहितासाठी आहे, राजकारणासाठी घेतलेला नाही. जो निर्णय अत्यंत कठिण वाटत होता आणि त्यावर निर्णय घेणे अशक्य वाटत होते तो आज शक्य होत आहे असे मोदी म्हणाले. 

मोदी पुढे म्हणाले, रेल्वेमार्गाची निर्मिती झाली, तरी हे लोक विरोध करतील. त्यांचे हृदय नक्षलवादी आणि दहशतवाद्यांशी धडकत असते. आज प्रत्येक भारतीय लडाख आणि जम्मू-काश्मीरमधील जनतेच्या पाठिशी आहे. तेथील लोक विकासाला चालना देण्यासाठी तसेच शांती प्रस्थापित करण्यासाठी ते आमच्यासोबत उभे राहतील.