Wed, Jun 03, 2020 03:14होमपेज › National › आक्षेपार्ह पोस्ट केल्याने नंदुरबारच्या भाजयुमो जिल्हाध्यक्षाला अटक

आक्षेपार्ह पोस्ट केल्याने नंदुरबारच्या भाजयुमो जिल्हाध्यक्षाला अटक

Last Updated: Nov 09 2019 10:19AM
नंदुरबार : प्रतिनिधी

अयोध्या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर अफवा पसरवून कायदा सुव्यवस्था बिघडली जाऊ नये, यासाठी सतर्क असलेल्या नंदुरबार सायबर सेलने सोशल मीडियावर कडक नजर ठेवली असून आक्षेपार्ह संदेश टाकल्याप्रकरणी भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष केतन रघुवंशी यांना मध्यरात्री अटक करण्यात आली.

दरम्यान, कोणीही धार्मिक भावना दुखावणाऱ्या पोस्ट सोशल मीडियातून प्रसारित करू नये तसेच जो काही निकाल लागेल त्यावर उलट सुलट प्रतिक्रिया देऊ नये, कायदा-सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी केले आहे. 

अयोध्येतील राम मंदिर बाबरी मशीद प्रकरणाचा उच्च न्यायालयाकडून आज निकाल घोषित होणार असल्याच्या पार्श्वभूमीवर नंदुरबार जिल्ह्यात सर्वत्र चोख पोलिस बंदोबस्त लावण्यात आला आहे. एसआरपीचे तीन प्लाटून तैनात ठेवण्यात आले आहेत. नंदुरबार शहरात १२० एसआरपी जवान शहराच्या विविध भागात नियुक्त करण्यात आले आहेत. नंदुरबार शहरात प्रवेश करण्याच्या सर्व मार्गावर सुरक्षा पथक नियुक्त करण्यात आले असून वाहनांचीदेखील तपासणी केली जात आहे.

विशेषतः सोशल मीडियावर कडक नजर ठेवण्यात आली असून त्यासाठी जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयातून स्वतंत्र सायबर सेल कार्यरत आहे. विशेष प्रशिक्षण घेतलेले सात ते आठ कर्मचाऱ्यांचे पथक सोशल मीडियावर नजर ठेवून आहेत. स्वतः जिल्हा पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित अतिरिक्त पोलिस अधीक्षक चंद्रकांत गवळी, विभागीय पोलिस अधिकारी रमेश पवार, शहर पोलिस निरीक्षक नंदवाळ यांच्यासह १२ अधिकारी सर्व बंदोबस्त हाताळत आहेत.