सचिन पायलट यांच्यासह १८ आमदारांना अपात्रतेची नोटीस

Last Updated: Jul 15 2020 12:09PM
Responsive image
सचिन पायलट


जयपूर : पुढारी ऑनलाईन

सचिन पायलट यांना राजस्थानच्या उपमुख्यमंत्रीपदावरून आणि प्रदेशाध्यक्ष पदावरून हटवल्यानंतर आता पायलट आणि त्यांच्या समर्थक १८ आमदारांना अपात्रतेची नोटीस बजावण्यात आली आहे. राजस्थान विधानसभेचे सभापती सी. पी. जोशी यांच्यामार्फत ही नोटीस देण्यात आली आहे. काँग्रेस विधीमंडळ पक्षाच्या बैठकीस हजर न राहिल्याबद्दल पायलट आणि त्यांच्या समर्थक आमदारांवर ही कारवाई करण्यात आली आहे.  

काँग्रेस विधीमंडळ पक्षाची सोमवारी आणि मंगळवारी अशी दोन दिवस बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीला पायलट यांच्यासह १९ आमदार हजर राहिले नव्हते. या आमदारांना आता नोटीस बजावण्यात आली आहे. जर त्यांनी या नोटिसीला दोन दिवसांत उत्तर दिले नाही तर ते काँग्रेस विधीमंडळ पक्षाचे सदस्यत्व मागे घेत आहेत असे समजले जाईल, अशी माहिती काँग्रेसचे सरचिटणीस अविनाश पांडे यांनी दिली आहे.

या आमदारांना पक्षातून बडतर्फ करण्यासाठी सभापतींकडे याचिका दाखल केली आहे. जर आमदारांनी दिलेले उत्तरे योग्य नसतील तर कारवाई करण्याचा निर्णय सभापतींना आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्या सरकारविरोधात बंडाचे निशाण फडकावणाऱ्या सचिन पायलट यांना उपमुख्यमंत्रीपदावरून तसेच राजस्थान प्रदेश काँग्रेसच्या अध्यक्षपदावरुन काल हटविण्यात आलं. काँग्रेसच्या या कारवाईनंतर पायलट भाजपमध्ये प्रवेश करतील अशी अटकळ बांधली जात आहे. याच दरम्यान पायलट यांनी आपण भाजपमध्ये प्रवेश करणार नसल्याचे म्हटले आहे. याबाबत एएनआयने वृत्त दिले आहे.