मराठा आरक्षणाला स्थगिती नाही; पुढील सुनावणी २७ जुलैला 

Last Updated: Jul 15 2020 1:17PM
Responsive image
file photo


नवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन

मराठा आरक्षणप्रश्नी आज बुधवारी सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली. मराठा आरक्षणावर तूर्तास अंतरिम आदेश दिलेला नाही. आता पुढील सुनावणीसाठी २७ जुलैला होणार आहे. सुनावणीसाठी सुप्रीम कोर्टाकडून ३ दिवसांचा कालावधी दिलेला आहे.  

वाचा : मराठा आरक्षणासाठी सुप्रीम कोर्टात ज्येष्ठ वकिलांची भरभक्कम फौज

आजच्या सुनावणीत मराठा समाजाला फार मोठा दिलासा मिळाला आहे. आरक्षणाला कुठल्याही प्रकारची स्थगिती मिळाली नाही. दिनांक २७, २८ व २९ जुलै रोजी अंतिम सुनावणी होणार आहे. कायद्याच्या चौकटीत आपलं आरक्षण अबाधित राहील व आपल्या लढ्याला यश मिळेल, असा विश्वास मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक विनोद पाटील यांनी व्यक्त केला आहे. 

मराठा आरक्षणानुसार देण्यात आलेल्या वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या प्रवेशाला आव्हान देणार्‍या याचिकेवर आज सुनावणी झाली. याचिकाकर्ते गुणवंत सदावर्ते यांनी या आरक्षणाला अंतरिम स्थगिती देण्याची मागणी केली आहे. राज्य सरकार त्यावर आपली बाजू मांडत आहे. तर मराठा संघटनांनी अनेक हस्तक्षेप याचिका दाखल केल्या असून, सरकार आणि मराठा संघटनांकडूनही वकिलांची मोठी टीम कोर्टात उभी करण्यात आली आहे.  

वाचा : सारथी संस्थेला ८ कोटींची मदत; उपमुख्यमंत्री अजित पवारांची घोषणा

मराठा समाजातील विद्यार्थ्यांना मराठा आरक्षणांतर्गत वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी प्रवेश देण्यात आले होते. सुमारे अडीचशे विद्यार्थ्यांना या आरक्षणाचा लाभ झाला. या आरक्षणाला उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले असता, उच्च न्यायालयाने हे आरक्षण कायम ठेवले. त्यावर या निर्णयाला सुप्रीम कोर्टात आव्हान देण्यात आले आहे. मराठा आरक्षणावर निर्णय होत नाही तोपर्यंत या निर्णयाला अंतरिम स्थगिती देण्याची मागणी याचिकाकर्ते गुणवंत सदावर्ते यांनी केली आहे. मात्र, यापूर्वी झालेल्या सुनावणीत सुप्रीम कोर्टात त्यावर निर्णय घेतला नाही.