Tue, Jun 15, 2021 12:51होमपेज › National › नव्या शिक्षण धोरणामुळे देश होणार आत्मनिर्भर!

नव्या शिक्षण धोरणामुळे देश होणार आत्मनिर्भर!

Last Updated: Aug 01 2020 7:04PM
नवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन

नुकत्याच नव्या शिक्षण धोरणास मंजुरी देण्यात आली आहे. भारतीय शिक्षण पद्धतीला जागतिक बदलांप्रमाणे आधुनिक बनविण्याची ही सुरूवात आहे. त्याचाच एक भाग म्हणून या नव्या धोरणाची आखणी एकविसाव्या शतकातील नवयुवकाचे विचार, त्यांच्या आकांक्षा ध्यानात घेऊन करण्यात आली आहे. नव्या शिक्षण धोरणामुळे देश आत्मनिर्भर होणार, यात कुठलीही शंका नाही, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी स्मार्ट इंडिया हॅकेथॉनमध्ये सहभागी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना केले.

सध्याचे एकविसावे शतक हे ज्ञानाचे आणि वेगवान बदलांचे शतक आहे. त्यामुळे भारतालादेखील जागतिक प्रवाहांप्रमाणे बदलणे गरजेचे आहे. शिक्षणात होणाऱ्या बदलांना तातडीने आत्मसात करणे अंत्यत गरजेचे आहे. त्यासाठीच नव्या शिक्षण धोरणास मंजुरी देण्यात आली असून त्यात अनेक सकारात्मक बदल करण्यात आले आहेत. त्यामुळे आता एखाद्या विद्यार्थ्यास गणितासोबत संगीत शिकायचे असेल, तर ते शक्य होणार आहे. त्याचप्रमाणे नव्या शिक्षण धोरणाची आखणी करताना एकविसाव्या शतकातील बदलांचे प्रतिबिंब त्यात असेल, याची काळजी घेण्यात आली आहे, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.

नव्या शिक्षण धोरणात संशोधनास विशेष महत्व देण्यात आल्याचे पंतप्रधान मोदी यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले की, सध्याचा कालावधी हा संशोधनाचा कालावधी आहे. विकास, नवोन्मेष, उद्योजकता यासाठी आवश्यक ती परिस्थिती तयार करण्यासाठी आता देशात विशेष प्रयत्न केले जाता आहेत आणि त्याचे सकारात्मक परिणाम समोर येत आहेत. स्मार्ट इंडिया हॅकेथॉनद्वारे देशातील तरुण वर्ग नवोन्मेषाकडे वळत आहे, ही अतिशय आशादायक बाब असल्याचेही पंतप्रधानांनी सांगितले.