होमपेज › National › अन् माकडांनी हिसकावले कोरोना रूग्‍णांचे सॅम्‍पल; व्हिडिओ व्हायरल

अन् माकडांनी हिसकावले कोरोना रूग्‍णांचे सॅम्‍पल

Last Updated: May 29 2020 4:48PM
लखनौ  : पुढारी ऑनलाईन 

मर्कट लिलांचे किस्‍से आपण पाहिले आणि ऐकले असतील. अशीच एक मर्कट लिला उत्‍तर प्रदेशातील मेरठमध्ये समोर आली आहे. मेरठच्या मेडिकल कॉलेज जवळ माकडांचा उच्छाद सुरू आहे. या मेडिकल कॉलेलमध्ये कोरोनाग्रस्‍तांचे तपासणीसाठी नेण्यात येणारे तीन सॅम्‍पल माकडांनी हिसकावून नेले. यामुळे या रूग्‍णांचे पुन्हा एकदा सॅम्‍पल घेण्यात आले आहेत. 

ही घटना दोन दिवसांपूर्वी घडली आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्‍यावर ही गोष्‍ट समोर आली आहे. या व्हिडिओमध्ये माकडे झाडावर बसली आहेत. त्‍यांच्या हातामध्ये असलेली सॅम्‍पल कलेक्‍शनचे किट ते दाताने चावत आहेत. या संबंधी मेडिकल कॉलेजचे प्राचार्य डॉ. एसके गर्ग यांचे म्‍हणणे आहे की, माझ्याकडेही या प्रकारचा व्हिडिओ आला होता. यामध्ये काही स्‍पष्‍ट होत नाही. त्‍यामुळे या गोष्‍टीच्या चौकशीसाठी प्रमुख अधीक्षक डॉ. धीरज बालियान यांना पाठवल्‍याच ते म्‍हणाले. 

दरम्‍यान डॉ. धीरज बलियान यांच्या म्‍हणण्यानुसार लॅब टेक्‍नीशियनने आरोग्‍य कर्मचाऱ्यांकडून कोरोनाचे सॅम्‍पल माकडांनी हिसकावल्‍याचे आणि त्‍यानंतर ते नष्‍ट केल्‍याचे सांगितले होते. मात्र यानंतर त्‍या रूग्‍णांचे नव्याने सॅम्‍पल घेण्यात आले. 

या सॅम्‍पलच्या संपर्कात कोणतीही व्यक्‍ती आलेली नाही. मात्र हे सॅम्‍पल माकडाने फोडल्‍यामुळे ते माकड तर संक्रमीत होणार नाही ना अशी भिती नागरिकांमध्ये पसरली आहे.