Fri, May 07, 2021 18:44
सुपरसॉनिक ‘तेजस’ची निर्मिती करणाऱ्या पद्मश्री मानस बिहारींचे निधन

Last Updated: May 04 2021 3:45PM

नवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन 

देशातील पहिले सुपरसॉनिक लढाऊ विमान ‘तेजस’च्या निर्मितीत महत्त्वाची भूमिका बजावणारे पद्मश्री डॉ. मानस बिहारी वर्मा यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. दरभंगाच्या लहेरियासराय येथील निवासस्थानी सोमवारी रात्री त्यांनी अखेरचा श्वास घेतला. डॉ. वर्मा हे डीआरडीओ, बंगळुरूचे संरक्षण वैज्ञानिक, तसेच दिवंगत माजी राष्ट्रपती कलाम यांचे सहकारीही होते. डॉ. वर्मा यांचे पुतणे मुकुल बिहारी वर्मा यांनी याला दुजोरा दिला आहे. बौर येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार झाले.

‘तेजस’च्या निर्मितीत महत्त्वपूर्ण भूमिका

डॉ. मानस वर्मा हे मूळचे घनश्यामपूर ब्लॉकमधील बाऊर गावचे रहिवासी होते. सध्या ते केएम टँक मोहल्ला येथे वास्तव्यास होते. डॉ. वर्मा बंगळुरूच्या डीआरडीओ येथे संरक्षण वैज्ञानिक आणि माजी राष्ट्रपती एपीजे डॉ. अब्दुल कलाम यांचे सहायक होते. ‘तेजस’ या लढाऊ विमानांच्या निर्मितीत डॉ. वर्मा यांनी महत्त्वाची भूमिका पार पाडली होती. 

डॉ. मानस वर्मा यांचा जन्म २९ जुलै १९४३ रोजी दरभंगा जिल्ह्यातील घनश्यामपूर ब्लॉकमधील बाऊर या छोट्याशा गावात झाला. येथे जवळपास दरवर्षी पूर यायचा. डॉ. वर्मा यांना चार बहिणी आणि तीन भाऊ होते. त्यांचे प्राथमिक शिक्षण गावातच झाले. त्यांनी मधेपूर येथून उच्च माध्यमिक शिक्षण घेतले. यानंतर त्यांनी पाटणा सायन्स कॉलेज, बिहार अभियांत्रिकी महाविद्यालय आणि सागर विद्यापीठातून उच्च आणि तांत्रिक शिक्षण घेतले. डॉ. वर्मा निवृत्तीनंतर २००५ पासून आपल्या बाऊर गावात वास्तव्यास होते. अखेरपर्यंत ते वेगवेगळ्या स्वयंसेवी संस्थांमार्फत मुले आणि शिक्षकांमध्ये विज्ञानाचा प्रसार करण्याचे कार्य करत राहिले.

अनेक पुरस्कारांनी गौरव...

डॉ. वर्मा यांना अनेक पुरस्कारांनी गौरवण्यात आले. त्यांना माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी आणि माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या हस्ते डीआरडीओच्या ‘सायंटिस्ट ऑफ दी इयर’ आणि ‘टेक्नॉलॉजी लीडरशिप अवॉर्ड’ने सन्मानित करण्यात आले होते. २०१८ मध्ये त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.