Fri, Apr 23, 2021 12:54होमपेज › National › कर्ज हप्त्यांना सहा महिने स्थगिती द्या : सोनिया गांधी

कर्ज हप्त्यांना सहा महिने स्थगिती द्या : सोनिया गांधी

Last Updated: Mar 26 2020 6:56PM
नवी दिल्ली : पुढारी वृत्तसेवा

काँग्रेसच्या हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी यांनी कोरोना व्हायरसच्या पार्श्‍वभूमीवर देशभरात लागू केलेल्या २१ दिवसांच्या लॉकडाऊनचे समर्थन करणारे पत्र पंतप्रधान नरेंद्र मोदींना लिहिले आहे. तसेच सर्वसामान्यांना दिलासा देणारे उपायही या पत्रात सुचवले असून सर्व कर्ज हप्त्यांना ६ महिने स्थगिती द्यावी, अशी मागणी केली आहे.

तसेच डॉक्टर आणि आरोग्य कर्मचार्‍यांच्या सुरक्षिततेसाठी योग्य ती पावले उचलण्याचीही मागणी केली आहे. शिवाय, उद्योगांसाठी पॅकेज आणि सर्वसामान्य लोकांसाठीही दिलासा देण्याची मागणी केली आहे.

सोनिया गांधींनी पत्रात म्हटले आहे की, पुरवठा साखळी भक्‍कम केली जावी. केंद्र सरकारने सर्व मासिक कर्ज हप्त्यांना सहा महिने स्थगिती द्यावी. या काळातील व्याजही बँकांनी माफ करावे. लॉकडाऊनच्या काळात सरकारी कर्मचार्‍यांच्या वेतनातून कपात होणारे कर्जाचे हप्तेही ६ महिन्यांसाठी स्थगित करावेत. केंद्र सरकारने क्षेत्रनिहाय दिलासा देणार्‍या पॅकेजची घोषणा करावी.

न्याय योजना लागू करा...

कोरोना व्हायरसची लढाई लढत असलेल्या डॉक्टर आणि आरोग्य कर्मचार्‍यांसाठी एन-९५ मास्क आणि इतर आरोग्य उपकरणे उपलब्ध करून द्यावीत. मजूर आणि गरिबांना दिलासा देण्यासाठी न्याय योजना लागू करून थेट त्यांच्या बँक खात्यांत आर्थिक मदत द्यावी. काँग्रेसने प्रस्तावित केलेली ‘न्याय : किमान उत्पन्‍न गॅरंटी योजना’ लागू करणे गरजेचे आहे. गरिबांवर आर्थिक आघात होत असल्याने त्यांना या योजनेची अत्यंत गरज आहे. त्यामुळे त्यांना दिलासा मिळेल. या संकटकाळात शेतकर्‍यांचे कर्जाचे हप्तेही सहा महिने स्थगित करावेत. शेतकरी कर्जमाफीचा निर्णय नव्याने घेतला पाहिजे. लहान आणि मध्यम व्यापार्‍यांसाठी तसेच प्रत्येक क्षेत्रासाठी विशेष पॅकेजची घोषणा केली पाहिजे. तसेच करात सवलत, व्याजमाफी अशा सवलती दिल्याच पाहिजेत.