Tue, Jun 15, 2021 13:19होमपेज › National › #लॉकडाऊन : विवाहस्थळ गाठण्यासाठी वधूची ८० किमी पायपीट

#लॉकडाऊन : विवाहस्थळ गाठण्यासाठी वधूची ८० किमी पायपीट

Last Updated: May 23 2020 12:34PM
कानपूर : पुढारी ऑनलाईन

सध्या देशात लॉकडाऊनचा चौथा टप्पा सुरू आहे. या लॉकडाऊनमुळे अनेकांचे विवाह लांबणीवर पडले आहेत. कुणाच्या विवाहाची तारीख पुढे जात आहे तर कुणी खर्च वाचवून थोडक्या व-हाडींच्या उपस्थितीत आपली लग्नगाठ बांधत आहेत. दरम्यान, एका वधूने वाढत्या लॉकडाऊनला वैतागून आपल्या होणाऱ्या जीवनसाथीसोबत सात फेरे घेण्यासाठी ८० किमीची पायपीट केली असल्याची माहिती समोर आली आहे. 

या नवरी मुलगीचे नाव गोल्डी असे असून ती ४ मे रोजी बैसपूर गावातील वीरेंद्र कुमार राठौरसोबत विवाहबंधनात अडकणार होती. दरम्यान, लॉकडाऊनमुळे विवाहाची तारीख पुढे ढकलून १७ मे केली. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्याची घोषणा केली. त्यानंतर दोन्ही कुटुंबियांसमोर मोठा पेच प्रसंग निर्माण झाला. लग्नाची तारीख आणखी पुढे जाईल, या भीतीपोटी नवरी मुलगी गोल्डीने थेट नवऱ्या मुलाच्या घरचा रस्ता धरला. 

कानपूरच्या देहात मंगलपूर येथे राहणाऱ्या १९ वर्षीय गोल्डीने सलग १२ तास पायपीट करून भावी नवऱ्याचे गाव गाठले. नवऱ्या मुलाच्या कुटुंबियांना नवरी मुलीला अचानक दारात बघून धक्का बसला. या धक्क्यातून सावरत नवऱ्या मुलाच्या कुटुंबियांनी वधूचे जंगी स्वागत केले. तसेच तिच्या नातेवाईकांशी संवाद साधला. त्यानंतर दोन्ही कुटुंबाच्या संमतीने गावातील मंदिरात दोघांचे लग्न लावून देण्यात आले.

न सांगता गाठले होणाऱ्या नवऱ्याचे घर

एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत नवरी मुलगी म्हणाली,  ४ मे रोजी आमचे लग्न होणार होते. पण लॉकडाऊनमुळे ते टळले. त्यानंतर लॉकडाऊनचा तिसरा टप्पा संपण्याची वाट पाहिली. मात्र, त्यानंतही लॉकडाऊन ३१ मे पर्यंत वाढवण्यात आले.  कुटुंबाने लग्न पुढे ढकलण्याचा विचार केला पण कोणालाही न सांगता घर सोडून थेट नवऱ्याचे घर गाठले असल्याचे गोल्डने म्हटले आहे. 

गोल्डीने ८० किमी प्रवास सलग १२ तास पायपीट करुन केला. त्यानंतर ती नवऱ्याच्या गावात पोहचली. १२ तासाच्या प्रवासात तिने काहीही खाल्लं नाही. तिच्यासोबत एक छोटी बॅग होती. ज्यात काही कपडे होते. नवऱ्याच्या गावात पोहचल्यानंतर दोन्ही कुटुंबाच्या संमतीने गावातील मंदिरात गोल्डी आणि विरेंद्रकुमार राठोड यांचे लग्न लावण्यात आले. मास्क घालून लग्न करणाऱ्या जोडप्याचा फोटो सोशल मीडियात प्रचंड व्हायरल होत आहे.