Thu, Jun 04, 2020 07:39होमपेज › National › 'सोशल डिस्टन्सिंग'ला पत्रकार, अधिकाऱ्यांकडूनच हरताळ 

'सोशल डिस्टन्सिंग'ला पत्रकार, अधिकाऱ्यांकडूनच हरताळ 

Last Updated: Mar 28 2020 4:04PM
चेन्नई : पुढारी ऑनलाईन 

भारतात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता संपूर्ण देशात लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. याचबरोबर कोरोना संकटावर मात करण्यासाठी सध्यातरी 'सोशल डिस्टन्सिंग' ही एकमेव लस उपयुक्त ठरत असल्याचे जाणकारांचे मत आहे. त्यामुळे पंतप्रधानांपासून शाळकरी मुलांपर्यंत सर्वचजण हा उपाय गांभिर्याने घेण्याचे आवाहन करत आहेत. पण, हा उपाय माध्यम प्रतिनिधीच गांभिर्याने घेत नसल्याचे तामिळनाडूचे मुख्यमंत्री पलानीस्वामी यांच्या शुक्रवारी झालेल्या पत्रकार परिषदेवेळी दिसून आले. 

शुक्रवारी चेन्नईतील आरोग्य संचलनालयामधील कोरोना व्हायरस कंट्रोल रुमबाहेर मुख्यमंत्री पलानीस्वामी हे पत्रकारांना संबोधित करत होते. पण, यावेळी पत्रकार बंधू आणि सरकारी अधिकाऱ्यांनी पंप्रधानांच्या सोशल डिस्टन्सिंगच्या आवाहनाला हरताळ फासला. या पत्रकार परिषदेवेळी पत्रकार आणि सरकारी अधिकारी एकमेकांना खेटून उभे असल्याचे समोर आले आहे. एवढेच नाही तर खुद्द मुख्यमंत्री पलानीस्वामीही वरिष्ठ आरोग्य अधिकारी आणि पोलिसांच्या गराड्यात उभे होते. 

याबाबत काही पत्रकारांनी चिंता व्यक्त केली तरीही आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी याच्यावर काहीही प्रतिक्रिया दिली नाही. 

लॉकडाऊनमधून वगळण्यात आलेल्या अनेकांनी पत्रकारांना सोशल डिस्टन्सिंगचे पथ्य न पाळल्याप्रकरणी जबाबदार धरले आहे. भारत कोरोना प्रादुर्भावाच्या स्टेज 3 मध्ये प्रवेश करण्याच्या उंबरठ्यावर उभा आहे. त्यामुळे पंप्रधान नरेंद्र मोदींनी देशभरात लॉकडाऊन जाहीर करत 'सोशल डिस्टन्सिंग' ठेवण्याचे आवाहन केले होते. पंतप्रधानांनी आपल्या कॅबिनेट मंत्रीमंडळाच्या बैठकावेळीही याचे पालन केले होते. 

तामिळनाडूमध्ये आतापर्यंत कोरोनाची लागण झालेल्यांची संख्या 40 वर पोहोचली आहे. मुख्यमंत्र्यांनी लॉकडाऊनचे कडक अंमलबजावणी करण्याचे नव्याने आदेश दिले आहेत. याचबरोबर या परिस्थितीशी सामना करण्यासाठी राज्याच्या रुग्णालयात 500 डॉक्टरांची आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांची नेमणूक केली आहे.