Wed, May 22, 2019 20:17होमपेज › National › पुलवामा : दहशतवाद्‍यांनी केलं जवानाचं अपहरण 

पुलवामा : दहशतवाद्‍यांनी केलं जवानाचं अपहरण 

Published On: Jun 14 2018 4:21PM | Last Updated: Jun 14 2018 4:32PMश्रीनगर : अनिल साक्षी

जम्मू-काश्मीरमधील पुलवामा भागातून दहशतवाद्यांनी लष्कराच्या एका जवानाचे अपहरण केले. औरंगजेब असे या जवानाचे नाव असून, तो पूंछ जिल्ह्यातील रहिवाशी होता. औरंगजेब हा ईदसाठी आपल्या गावी निघाला असताना ही घटना घडली. हिजबुलचा कमांडर समीर टायगरचा खात्मा करणार्‍या कमांडो दलातील तो जवान असल्याची माहिती पोलिसांनी दिली. या जवानाच्या शोधासाठी लष्कराने व्यापक शोधमोहीम हाती घेतली आहे. औरंगजेब हा राष्ट्रीय रायफल्सचा जवान होता आणि शोपिया जिल्ह्यात तैनात होता. पुलवामा भागातूनच बुधवारी रात्री दहशतवाद्यांनी एक नागरिक आणि पोलिसचेही अपहरण केले होते.

दोन दहशतवाद्यांचा खात्मा ; एक जवान शहीद

दरम्यान, बांडीपोरा जिल्ह्यातील  पनार जंगलात झालेल्या चकमकीत सुरक्षा दलाने दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला. यात एक जवानही शहीद झाला आहे. या जंगलात दहशतवादी लपून बसल्याची माहिती मिळाल्यानंतर सुरक्षादलाने शोधमोहीम हाती घेतली. त्याचवेळी दहशतवाद्यांनी गोळीबार करून पळून जाण्याचा प्रयत्न केला. भारतीय जवानांनी चोख प्रत्युत्तर देत दोघांना कंठस्नान घातले. नेमके किती दहशतवादी लपून बसले आहेत, याचा शोध रात्री उशिरापर्यंत सुरू होता.