Tue, Aug 04, 2020 13:31होमपेज › National › चिनी ऊर्जा उपकरणांच्या आयातीला ब्रेक लागणार

चिनी ऊर्जा उपकरणांच्या आयातीला ब्रेक लागणार

Last Updated: Jul 03 2020 6:28PM
नवी दिल्ली : पुढारी वृत्तसेवा

आमच्या सैनिकांना मारणाऱ्या देशातून कोणतीही आयात होऊ दिली जाणार नाही, असे सांगत चीनहून आयात होणाऱ्या ऊर्जा उपकरणांच्या आयातीला ब्रेक लावला जात असल्याची घोषणा केंद्रीय ऊर्जा मंत्री आर. के. सिंग यांनी शुक्रवारी एका कार्यक्रमादरम्यान बोलताना केली.

मे महिन्याच्या सुरुवातीपासून भारत आणि चीनचे सैनिक लडाखमध्ये अनेक पॉइंटवर आमनेसामने आहेत. पूर्व लडाखमधील गलवान खोऱ्यात चीनने धोकेबाजी करून २० भारतीय सैनिकांना मारले होते. तेव्हापासून भारताने चीनविरोधात आक्रमक पवित्रा घेतला. तसेच चीनवरील सामानाची भिस्त कमी करण्याचा प्रयत्न चालविला आहे. अलीकडेच भारताने डिजिटल स्ट्राईक करत ५९ चिनी ॲपवर बंदी घातली होती. चीनला आगामी काळात आणखी दणके देण्याचीही भारताची योजना आहे. 

केवळ चीनच नव्हे तर पाकिस्तानहून आयात होणाऱ्या ऊर्जा उपकरणांनादेखील मनाई केली जाणार असल्याचे सांगून आर. के. सिंग पुढे म्हणाले की, राज्यांमध्ये कार्यरत असलेल्या वीज कंपन्यांनी चीनला ऊर्जा उपकरणांच्या आयातीसाठी कोणत्याही प्रकारची ऑर्डर्स देऊ नयेत. भारतात सगळ्या प्रकारची ऊर्जा उपकरणे बनतात. देशात एकूण ७१ हजार कोटी रुपये किंमतीची उर्जा उपकरणे आयात केली जातात. यातील २१ हजार कोटी रुपयांची उपकरणे चीनहून येतात. ही आयात आता बंद केली जात आहे. चिनी उपकरणांमध्ये मालवेअर अथवा ट्रोजन हॉर्स असण्याची शक्यता असते. यामुळे चीनमध्ये बसून भारताच्या ऊर्जा क्षेत्रात हाहाकार उडवला जाऊ शकतो, अशी भीती असल्याचेही सिंग यांनी यावेळी स्पष्ट केले.