Mon, May 25, 2020 20:11होमपेज › National › कोरोनाचा संसर्ग वाढला; आठ राज्यांत भीलवाडा पॅटर्ननुसार १२०० कंटेन्मेंट झोन 

कोरोनाचा संसर्ग वाढला; आठ राज्यांत भीलवाडा पॅटर्ननुसार १२०० कंटेन्मेंट झोन 

Last Updated: Apr 10 2020 3:32PM

file photo 

 

 

नवी दिल्ली : पुढारी वृत्तसेवा  

देशातील आठ राज्यांमध्ये १२०० कंटेन्मेंट झोन (नियंत्रण क्षेत्र) तयार करण्यात आले आहेत. कोरोनाबाधित रूग्णांची संख्या जास्त असलेल्या ठिकाणी हे झोन तयार करण्यात आल्याची माहिती केंद्र सरकारच्या अधिकाऱ्यांकडून देण्यात आली आहे. अशा ठिकाणी लॉकडाऊनची अत्यंत गंभीरपणे अंमलबजावणी करण्यात येत आहे. काही ठिकाणी तर संचारबंदी लागू करण्यात आली आहे. कोरोना संसर्ग रोखण्यासाठी गंभीर निर्णय घेण्यात येत आहेत. भारताने कोरोना संसर्ग रोखण्यात मोठ्या प्रमाणात यश मिळवले आहे. परंतु, तरीही येत्या काही दिवसांत परिस्थिती खूप बिघडली तर त्यासाठी ही तयारी करण्यात येत आहे, अशी माहिती देण्यात आली आहे.

वाचा : देशव्यापी लॉकडाऊन उठविला जाण्याची शक्यता कमी 

कंटेन्मेंट झोनमध्ये असलेल्या परिसरात कुणालाही घराबाहेर पडण्याची परवानगी नाही. शिवाय बाहेरून कुणालाही या परिसरात येण्याची परवानगी नाकारली जात आहे. राजस्थानमधील भीलवाडा पॅटर्नच्या आधारे याप्रकारचे झोन तयार करण्यात आल्याचे बोलले जात आहे. असे असतानाही देशातील रूग्णसंख्या वेगाने वाढत आहे. लॉकडाऊन तसेच कंटेन्मेंट झोनमध्ये नियमांची कडेकाट अंमलबजावणी करण्याची गरज त्यामुळे निर्माण झाली आहे.
 
कोरोना संसर्गावर तूर्त कुठलेही औषध नाही. अशात सामुहिक संसर्ग होवू नये त्यामुळे केंद्र तसेच राज्य सरकारांकडून योग्य उपाययोजना केल्या जात आहे. संसर्गाचा प्रभाव कमी करण्यासाठी रूग्णांवर तूर्त उपयुक्त ठरणारे हायड्रॉक्सीक्लोरोक्वीन आणि एझिथ्रोमायसिन ही औषधे पुरेशा प्रमाणात देशातील सर्व राज्यांमध्ये उपलब्ध करून देण्यात आले असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले आहे. 

जगात वेगवेगळ्या ठिकाणी करण्यात आलेल्या संशोधनातून असे दिसून आले आहे की, हायड्रॉक्सीक्लोरोक्वीन आणि एझिथ्रोमायसिन या दोन्ही औषधांच्या वापरामुळे रुग्ण लवकर कोरोना संसर्गमुक्त होत आहेत. त्यामुळे जगभरातून या दोन्ही औषधांची मागणी वाढली आहे.

वाचा : राज्यात १२५ कोरोना बाधित ठणठणीत बरे झाले!

अतिरिक्त औषधांचीच निर्यात

याच आठवड्यात केंद्र सरकारने या दोन्ही औषधांची निर्यात करण्याला मंजुरी दिली. ही दोन्ही औषधे ब्राझील, अमेरिका आणि इस्राईलला पाठविण्यात येणार आहे. सध्या भारताकडे या दोन्ही औषधांची जेवढी अतिरिक्त संख्या आहे तीच परदेशात पाठविण्यात येत आहे, असे एका सरकारी अधिकाऱ्यांनी सांगितले. अर्थात हायड्रॉक्सीक्लोरोक्वीन आणि एझिथ्रोमायसिन ही दोन्ही औषधे कोरोना विषाणू प्रादुर्भावावर कितपत प्रभावी आहेत, याबद्दल खूप चाचण्या घेण्यात आलेल्या नाहीत. पंरतु, सध्याच्या स्थितीत ही दोन्ही औषधे सगळ्याच देशांना आशादायी वाटताहेत. त्यामुळे त्याची मागणी वाढते आहे. भारताने सार्क गटातील देशांना त्याचबरोबर मॉरिशसलाही ही औषधे भेट म्हणून पाठविली आहेत.