Tue, Sep 22, 2020 06:17होमपेज › National › कोरोनामुळे मंदावणार विकास दर

कोरोनामुळे मंदावणार विकास दर

Last Updated: Mar 26 2020 8:04PM
नवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन 

कोरोना संसर्ग वेगाने पसरू नये म्हणून खबरदारीसाठी देशात २१ दिवसांसाठी लॉकडाऊन करण्यात आले आहे. परंतु, इतर देशांप्रमाणे भारताच्या अर्थव्यवस्थेवरही लॉकडाऊनचा परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. बार्कलेजने  सादर केलेल्या अहवालात हे निष्कर्ष नोंदवण्यात आले आहेत. देशातील तीन आठवड्यांच्या लॉकडाऊनमुळे २०२० मध्ये विकास दर २.५ टक्क्यांपर्यंत घसरू शकतो, अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे. आर्थिक वर्षाच्या सुरुवातीला हा विकास दर ४.५ टक्के राहील, असा अंदाज व्यक्‍त करण्यात आला होता. 

अनेक रेटिंग संस्था, आयएमएफ आणि जागतिक बँकेसारख्या आर्थिक संस्थांनीही भारताच्या अर्थव्यवस्थेसंबंधी निराशाजनक अंदाज वर्तवले आहेत. मुडीजने ‘जी-२०’ देशांमध्ये मंदीचे सावट राहणार असल्याचा अंदाज वर्तवला आहे. 

ब्रिटनमधील आर्थिक कंपनी बार्कलेजने आपल्या अहवालात लॉकडाऊनचा कालावधी आणखी एक आठवडा वाढवला जाऊ शकतो, असे भाकीतही वर्तवले आहे. भारताने तीन आठवड्यांचा लॉकडाऊन घोषित केला तरी त्यानंतर आठ आठवडे अंशिक लॉकडाऊन लागू केला जाईल, असे निरीक्षण नोंदवण्यात आले आहे. तीन आठवड्यांच्या लॉकडाऊनमुळे देशाला ९० अब्ज डॉलरचे नुकसान सहन करावे लागेल. अर्थव्यवस्थेला जवळपास १२० अब्ज डॉलरचे नुकसान सोसावे लागणार असून हे नुकसान जीडीपीच्या ४ टक्के राहील, अशी शक्यताही वर्तवण्यात आली आहे. या सर्वांचा परिणामस्वरूप विकास दर २ टक्क्यांनी घसरेल. 

बार्कलेजने भारताचा विकास दराचा अंदाज २ टक्क्यांनी घटवून २.५ टक्के केला आहे. असे झाले तर १९९२ च्या आर्थिक सुधारणांनंतरचा हा सर्वात कमी विकास दर राहील. जागतिक बँकेच्या मते, भारतीय अर्थव्यवस्था १९९१ मध्ये १.०६ टक्क्यांच्या वेगाने वाढली होती. त्यानंतर देशात आर्थिक सुधारणांमुळे वेग आला. २०२०-२१ साठी जागतिक बँकेने विकास दर ३.५ टक्के राहण्याचा अंदाज वर्तवला आहे.

लॉकडाऊनचे सकारात्मक परिणाम 

लॉकडाऊनचा मूळ उद्देश अजून सफल व्हायचा असला, तरी त्याचे काही चांगले परिणाम बघायला मिळत आहेत. देशातील १०४ पैकी लखनौ तसेच मुझफ्फरपूर वगळता सगळीकडे हवेची गुणवत्ता सुधारल्याचे दिसून आले. हवामानातील बदल आणि कोरोना विषाणूमुळे उचललेल्या प्रतिबंधात्मक उपायांमुळे पहिल्यांदाच देशाला शुद्ध हवा मिळाली. गुरुवारी दिल्लीचा वायू गुणवत्ता सूचकांक सरासरी ६७ अंक म्हणजे समाधानकारक श्रेणीत होता. वातावरणात पीएम २.५ प्रदूषक कण आणि नायट्रोजन ऑक्साईडमुळे प्रदूषणात मोठी घट झाल्याचे दिसून आले.
 

 "