Mon, Sep 21, 2020 12:34होमपेज › National › कुठे आहे मानवाधिकार?

कुठे आहे मानवाधिकार?

Last Updated: Jul 02 2020 8:45AM
जम्मू : अनिल साक्षी

जम्मू-काश्मीरमधील सोपोर येथे बुधवारी सकाळी दहशतवाद्यांनी सीआरपीएफच्या जवानांवर हल्ला केला. या हल्ल्यात एका 60 वर्षीय ज्येष्ठ नागरिकाचाही मृत्यू झाला; पण आपले आजोबा का निपचित पडले आहेत, हे तेथे असलेल्या तीन वर्षीय नातवाला कळत नव्हते. त्याच्या हातातील बिस्कीटही रक्ताने माखलेले होते. तो त्याच अवस्थेत मृतदेहावर बसून होता. बुधवारी व्हायरल झालेले हे छायाचित्र! 

हे हृदयविदारक द‍ृश्य पाहून माणुसकीलाही दया आली असेल. तथापि, एरवी मानवाधिकाच्या नावाने गळे काढणारे मात्र गप्पच होते आणि शोक व्यक्त करण्याचा हा प्रसंग असला, तरी त्याहीपेक्षा कुठे आहे मानवाधिकार, हाच सवाल तो निरागस मुलगा करत होता. 

बुधवारच्या चकमकीनंतर या ज्येष्ठ नागरिकाच्या मृतदेहावर बसलेल्या त्या तीन वर्षीय नातवाचे छायाचित्र व्हायरल झाले. या चित्राने सर्वांनाच विचलित करून टाकले. या हल्ल्यात एक जवान शहीद झाला, तर तीन वर्षीय नातवासोबत दूध खरेदी करण्यासाठी बाहेर पडलेल्या ज्येष्ठ नागरिकाचाही मृत्यू झाला. घटनास्थळी त्या 60 वर्षीय नागरिकाचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडलेला होता. कपडे रक्ताने माखलेले होते. तिथेच तो तीन वर्षांचा बालकही होता; पण एरवी उचलून घेणारे आजोबा आज मात्र त्याला उचलून घेत नव्हते. तो बालक खूप वेळ तिथेच आजोबांच्या मृतदेहावर बसून होता. पोलिसांच्या पथकातील एका कर्मचार्‍याने या मुलाला उचलून घेत चकमकस्थळापासून तातडीने दूर नेले. 

व्हायरल झालेल्या छायाचित्रांमध्ये तो निरागस बालक मृतदेहाजवळ बसलेला दिसतो. आणखी एका छायाचित्रामध्ये दहशतवाद्यांविरोधात पोझिशन घेतलेला एक जवान त्या बालकाला तिथून दुसर्‍या बाजूला जाण्याचा इशारा करताना दिसत आहे. 

काश्मीरमध्ये दहशतवादी आणि सुरक्षा यंत्रणा यांच्यातील चकमकीच्या बातम्या सामान्य आहेत. प्रत्येक दिवशी गोळीबाराच्या, दहशतवाद्यांच्या खात्म्याच्या घटना घडतच असतात. अलीकडच्या काळात तर मोठ्या संख्येने दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. तरीदेखील दहशतवादी त्यांच्या नापाक उद्देशापासून मागे हटायला तयार नाहीत, असे चित्र आहे.

 "