Sun, Jun 07, 2020 01:13होमपेज › National › बर्लिनची भिंत पडल्‍याच्‍या घटनेला तीस वर्ष पूर्ण 

बर्लिनची भिंत पडल्‍याच्‍या घटनेला तीस वर्ष पूर्ण 

Last Updated: Nov 09 2019 11:04AM

गुगल डुडल (फोटो : गुगल डुडल वरुन साभार)नवी दिल्‍ली : पुढारी ऑनलाईन 

बर्लिनची भिंत पडण्याच्या ऐतिहासिक घटनेला आज 30 वर्ष पूर्ण झाली आहेत. त्यानिमित्त गुगलकडून 'खास डूडल' तयार करण्यात आले आहे. 

या दिवसाचे औचित्य साधून बनवलेल्या गूगल डूडलमध्ये एक सिमेंटची भिंत पडल्याचे दाखवले आहे.  त्या पडलेल्या अवशेषांवर दोन बाजूंकडील दोन जण एकमेकांना घट्ट मिठी मारताना दिसत आहेत. दोन्ही देशांतील नागरिकांची त्या भिंतीकडे पाहण्याची भावना त्यामुळे त्वरित लक्षात येते. या दोघांची घट्ट मिठी नेहमीच एकसंघ राहण्‍याची ग्‍वाही देते असेच म्‍हणावे लागेल. 

बर्लिनच्‍या भिंतीचा इतिहास

बर्लिनची भिंत ही बर्लिन या शहराचे विभाजन करण्यासाठी उभारण्यात आलेली एक काँक्रिटची भिंत होती. दुसर्‍या महायुद्धानंतर पराभूत नाझी जर्मनीचे पूर्व जर्मनी व पश्चिम जर्मनी या  दोन स्वतंत्र राष्टांमध्ये दुभाजन करण्यात आले. या दुभाजनादरम्यान नाझी जर्मनीची राजधानी बर्लिनचे देखील पूर्व बर्लिन व पश्चिम बर्लिन असे दोन भाग करण्यात आले. पूर्व जर्मनीमधील कम्युनिस्ट राजवटीने १९६१ साली पश्चिम बर्लिनला पुर्णपणे वेढून टाकणारी ही भिंत बांधली. पूर्व जर्मनीमधून होणारे जर्मन नागरिकांचे पलायन थांबवणे हा ह्या भिंतीचा मुख्य उद्देश होता.

पश्चिम बर्लिनला पूर्णपणे वेढणारी बर्लिनची भिंत

बर्लिनची भिंत बांधण्यापूर्वी १९४५ ते १९६१ दरम्यान अंदाजे ३५ लाख पूर्व जर्मन नागरिकांनी पश्चिम जर्मनीमध्ये स्थलांतर केले होते होते. ही भिंत बांधल्यानंतर हे पलायन जवळजवळ संपूर्णपणे संपुष्टात आणण्यात आले.

दोन जर्मन राष्ट्रांच्या एकत्रीकरणाच्या प्रक्रियेतील महत्त्वाचा टप्पा 

९ नोव्हेंबर १९८९ रोजी पूर्व व पश्चिम जर्मनीमधील करारानुसार नागरिकांना सीमा ओलांडून जाण्याची परवानगी देण्यात आली. या  दिवसानंतर बर्लिनची भिंत टप्याटप्याने पाडुन टाकण्यात आली. ही घटना १९९० मध्ये झालेल्या दोन जर्मन राष्ट्रांच्या एकत्रीकरणाच्या प्रक्रियेतील महत्त्वाचा टप्पा मानला जातो.