कानपूर : पुढारी ऑनलाईन
उत्तर प्रदेशातील आठ पोलिसांच्या हत्या करणाऱ्या गँगस्टर विकास दुबेला आज, शुक्रवारी पोलिसांनी एन्काऊंटरमध्ये ठार केले. यामुळे उत्तर प्रदेशातील गेली ३० वर्षांची दुबेची दहशत संपली आहे.
वाचा : आठ पोलिसांची हत्या करणारा गँगस्टर विकास दुबे एन्काऊंटरमध्ये ठार
उत्तर प्रदेश पोलिसांच्या स्पेशल टास्क फोर्सची गाडी दुबेला घेऊन मध्य प्रदेशातून कानपूरला जात होती. मात्र, कानपूरजवळील बर्रा जवळ गाडी अचानक रस्त्यात पलटी झाली. या अपघातात ४ पोलिस जखमी झाले. या दरम्यान दुबेने संधीचा फायदा घेत पोलिसांकडून पिस्तूल हिसकावून पळून जाण्याचा प्रयत्न केला. पोलिस आणि दुबे याच्यात चकमक झाली. त्याला शरण येण्यास सांगण्यात आले. मात्र त्याने ऐकले नाही. अखेर पोलिसांनी त्याला एन्काऊंटरमध्ये ठार केले, अशी माहिती कानपूरचे पोलिस महानिरीक्षक मोहीत अग्रवाल यांनी दिली.
गंभीर जखमी अवस्थेत दुबेला रुग्णालयात नेले होते. मात्र, तेथे त्याला मृत घोषित करण्यात आले.
वाचा : उत्तर प्रदेशात आठ पोलिसांची हत्या करणारा विकास दुबे सापडला मध्य प्रदेशात पण...
गँगस्टर विकास दुबेला पकडण्यासाठी गेलेल्या कानपूर पोलिसांवर दुबेच्या टोळीने अंधाधुंद गोळीबार केला होता. या घटनेत ८ पोलिस शहीद झाले. या घटनेने संपूर्ण उत्तर प्रदेश हादरला होता. पोलिसांवर झालेला आतापर्यंतचा हा सर्वात मोठा हल्ला होता. हिस्ट्री सीटर विकास दुबेवर अनेक गुन्हे दाखल आहेत. संपूर्ण उत्तर प्रदेशाला विकास दुबेने हादरवून सोडले होते.
विकास दुबेला अटक करण्यापूर्वी सुमारे आठवडाभर तो पोलिसांना चकवा देत राहिला. त्याचा शोध सुरुच होता. तो उत्तर प्रदेशातून दिल्लीला पळून गेला. तेथून तो फरिदाबादला आला. तेथे तो एका हॉटेलमध्ये राहिला. सीसीटीव्ही फुटेजमधून हे स्पष्ट झाले आहे. तेथून तो मध्य प्रदेशातील उज्जैनमध्ये पोहोचला. उज्जैन येथील महाकाल मंदिरातून त्याला अटक करण्यात आली.
वाचा : गँग्स ऑफ कानपूर : कोण आहे हा विकास दुबे ज्यानं उत्तर प्रदेशाला हादरवून सोडलं?