कानपूर : पुढारी ऑनलाईन
'उत्तर प्रदेश पोलिसांनी माझ्या मुलाविरोधात कारवाई केली, ते योग्यच केलं', असे गँगस्टर विकास दुबेचे वडील रामकुमार दुबे यांनी म्हटले आहे. ते एका वृत्तसंस्थेशी बोलत होते.
शुक्रवार दि. १० रोजी कानपूरमध्ये विकास दुबे एन्काऊंटरमध्ये ठार झाला. यावर रामकुमार म्हणाले की, माझ्या मुलाने ८ पोलिसांची हत्या केली होती आणि हे अक्षम्य पाप होतं. त्याने आमचे म्हणणे ऐकले? जर आमचे म्हणणे ऐकले असते तर त्याचे आयुष्य असे संपले नसते. विकासने कधीही कोणत्याही प्रकारे आम्हाला मदत केली नाही. त्याने आमची वडिलोपार्जित संपत्ती खर्च केली. त्याने ८ पोलिसांनादेखील मारलं. हे एक अक्षम्य पाप होतं. पोलिसांनी योग्यचं केलं आहे. जर त्याच्याविरोधात कारवाई केली नसती तर उद्या त्याने दुसरा गुन्हा केला असता.'
रामकुमार दुबे म्हणाले की, 'विकास दुबेने पोलिसांवर जो हल्ला केला, त्याला माफ केलं जाऊ शकत नाही. मी त्याच्या क्रियाकर्ममध्येदेखील जाणार नाही.'
कानपूरमधील भैरव घाट येथे विकास दुबेच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले. तेव्हा त्याची पत्नी, छोटा मुलगा आणि मेव्हणा उपस्थित होता. त्यांच्याशिवाय कुटुंबातील कोणताही सदस्य अंत्यसंस्कारासाठी उपस्थित नव्हते.
विकासला गुरुवार दि. ९ रोजी उज्जैनमधील महाकाल मंदिरातून अटक करण्यात आली होती. कानपूरमध्ये पोलिसांच्या हत्याकांडानंतर विकास फरार झाला होता.
उज्जैनमध्ये अटकेनंतर उत्तर प्रदेश एसटीएफची टीम विकासला पकडण्यासाठी गेली होती. पोलिसांच्या माहितीनुसार, शुक्रवारी दि. १० रोजी सकाळी कानपूरमध्ये पोहोचल्यानंतर ते त्यांची गाडी पलटली. या गाडीत विकास होता. विकासने पोलिस अधिकाऱ्याची पिस्तुल हिसकावून पळून जाण्याचा प्रयत्न केला. त्याला सरेंडर होण्यास सांगितले असता त्याने ऐकले नाही आणि त्याने गोळीबार केला. प्रत्युत्तरादाखल गोळीबारात विकास मारला गेला. उत्तर प्रदेश सरकारने विकास दुबेवर ५ लाखांचे बक्षीस ठेवले होते.