Sat, Sep 19, 2020 07:41होमपेज › National › गँग्स ऑफ कानपूर : कोण आहे हा विकास दुबे ज्यानं उत्तर प्रदेशाला हादरवून सोडलं?

गँग्स ऑफ कानपूर : कोण आहे हा विकास दुबे ज्यानं उत्तर प्रदेशाला हादरवून सोडलं?

Last Updated: Jul 03 2020 12:15PM
कानपूर : पुढारी ऑनलाईन 

कुख्यात गुन्हेगार विकास दुबेला पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर अंधाधुंद गोळीबार करण्यात आला. या घटनेत ८ पोलिस कर्मचारी शहीद झाले. सीओ देवेंद्र कुमार मिश्रा, महेश यादव, चौकी प्रमुख अनूप कुमार, उपनिरीक्षक नेबुलाल, कॉन्स्टेबल सुलतान सिंह, राहुल, जितेंद्र आणि बबलू अशी शहीद झालेल्या पोलिस कर्मचाऱ्यांची नावे आहेत. या घटनेने संपूर्ण उत्तर प्रदेश हादरला आहे. पोलिसांवर झालेला आतापर्यंतचा हा सर्वात मोठा हल्ला असल्याचे म्हटले जात आहे. हिस्ट्री सीटर विकास दुबेवर अनेक गुन्हे दाखल आहेत. संपूर्ण उत्तर प्रदेशाला विकास दुबेने हादरवून सोडले आहे. 

विकास दुबे अनेक राजकीय पक्षांमध्येदेखील कार्यरत होता. बिठूर येथील शिवली थाना क्षेत्रातील बिकरु गावात राहणारा विकास दुबे कुख्यात गुन्हेगार आहे. त्याने आपले घर किल्ल्यासारखे बनवले आहे. किल्ल्यासारख्या रचनेमुळे त्याच्या घरात प्रवेश करणे कठिण आहे. 

पोलिस ठाण्यात घुसून राज्यमंत्र्यांची हत्या

हिस्ट्री सीटर असलेल्या विकास दुबे याने २००१ मध्ये राजनाथ सिंह यांच्या सरकारच्या काळात मंत्रीपदाचा दर्जा मिळालेल्या संतोष शुक्ला यांची ठाण्यात घुसून हत्या केली होती. त्यानंतर संपूर्ण उत्तर प्रदेश हादरले होते. त्याच्याविरोधात ६० गुन्ह्यांची प्रकरणी नोंद आहेत. मात्र, अद्याप तो पोलिसांच्या हाती लागलेला नाही. 

कोणत्याही पोलिसाने दिली नाही साक्ष 

विकास दुबे कुठल्याही फिल्मी खलनायकापेक्षा कमी नाही. ठाण्यात घुसून राज्यमंत्र्यांची हत्या केल्याचा आरोप झाल्यानंतरदेखील त्याचे कुणी काही बिघडवू शकले नाही. इतकी मोठी घटना झाल्यानंतरदेखील कोणत्याही पोलिसाने विकासविरोधात कोर्टात साक्ष दिली नाही. त्यानंतर त्याला सोडून देण्यात आले.

अनेक गुन्हे 

२००० मध्ये कानपूरमधील शिवली ठाणाक्षेत्र स्थित ताराचंद इंटर कॉलेजचे सहाय्यक प्रबंधक सिद्धेश्वर पांडेय यांच्या हत्या प्रकरणातही विकास दुबेचे नाव समोर आले होते. याच वर्षी त्याच्यावर रामबाबू यादवच्या हत्येप्रकरणी कट रचण्याचा आरोप झाला होता. हा कट त्याने तुरूंगात बसून रचला होता. २००४ मध्ये एक केबल व्यवसायिक दिनेश दुबेच्या हत्या प्रकरणातदेखील विकासचे नाव आले होते. तर २०१३ मध्येदेखील विकास दुबेने एकाची हत्या केली होती.

तुरूंगात बसून भावाच्या हत्येचा कट रचला 

२०१८ मध्ये विकास दुबेने आपला चुलत भाऊ अनुरागवर जीवघेणा हल्ला करवला होता. अनुरागच्या पत्नीने विकाससह चार लोकांच्याविरोधात एफआयआर दाखल केले होते. त्यावेळी विकास तुरूंगात होता. 

हिस्ट्री सीटर विकास दुबेवर २००२ मध्ये मायावती सरकारच्या काळात अवैध पध्दतीने जमिनी खरेदी केल्याचा आरोप आहे. त्याने अवैध पध्दतीने कोटी रुपयांची संपत्ती जमवली आहे. बिठूरमध्ये त्याची शाळा आणि कॉलेज आहे. तो एक लॉ कॉलेजचा मालकदेखील आहे. 

तुरूंगातून जिंकली होती निवडणूक 

विकास दुबेने तुरूंगात असताना निवडणूक लढवली होती आणि शिवराजपूरमधून नगर पंचायतची निवडणूक जिंकली होती. तुरूंगातून त्याने अनेक गुन्ह्यांचे कट रचले होते. 

 "