होमपेज › National › सुमित्रा महाजन यांचा भाजपला घरचा आहेर, म्हणाल्या...

सुमित्रा महाजन यांचा भाजपला घरचा आहेर, म्हणाल्या...

Last Updated: Dec 03 2019 2:54PM
इंदूर : पुढारी ऑनलाईन

मध्यप्रदेशमध्ये शिवराज सिंह चौहान यांच्या नेतृत्वाखाली भाजपचे सरकार कार्यरत असताना राज्याच्या दृष्टीने अनेक महत्त्वाचे आणि विकासाचे विषय मी उपस्थित करू शकत नव्हते. त्यावेळी मला मौन बाळगावे लागले. कारण, राज्यात माझ्याच पक्षाची अर्थात भाजपची सत्ता होती, अशी खळबळजनक खुलासा खुद्द माजी लोकसभाध्यक्ष आणि भाजपच्या ज्येष्ठ नेत्या सुमित्रा महाजन यांनी केला आहे. रविवारी रात्री एका कार्यक्रमात त्या बोलत होत्या. जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी तसेच महत्त्वाचे, विकासाचे मुद्दे उपस्थित करण्यासाठी कधीकधी मला काँग्रेसच्या नेत्यांचीच मदत घ्यावी लागत होती, अशीही खंत त्यांनी यावेळी बोलून दाखविली. 

सुमित्रा महाजन म्हणाल्या की, मध्य प्रदेशमधील गेल्या सरकारच्या काळात अनेक महत्त्वाचे विषय मी उपस्थित करू शकत नव्हते. मग अशावेळी मी काँग्रेसच्या नेत्यांना ते विषय उपस्थित करायला सांगत होते. त्याचवेळी त्यांनी विषय उपस्थित केल्यावर मी तत्कालिन मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांना त्यामध्ये लक्ष घालण्यास सांगितले जाईल, असे आश्वासन मी काँग्रेसच्या नेत्यांना देत होते.

त्या म्हणाल्या, केवळ पक्षाची शिस्त मोडली जायला नको म्हणून आपण अनेकवेळा लोकांसाठी महत्त्वाचे असलेले विषय जाहीर व्यासपीठांवर मांडत नव्हतो. विनाकारण आपण विषय उपस्थित केल्यामुळे पक्षाची अडचण होऊ नये, म्हणून आपण तसे करीत नसल्याचे महाजन यांनी म्हटले आहे. 

तसेच, जेव्हा इंदूरच्या विकासाचा विषय येत होता. त्यावेळी आम्ही सर्वजण पक्षभेद विसरून एकत्र येत होतो. केवळ पक्षशिस्तीचा भाग म्हणूनच मला कधीही मध्य प्रदेशमधील भाजप सरकारच्या विरोधात बोलता येत नव्हते, असेही त्यांनी स्पष्ट केले. 

माजी लोकसभाअध्यक्षा महाजन यांच्या या खळबळजनक वक्तव्यामुळे भाजपच्या पुढील वाटचालीत अडथळे निर्माण होण्याची शक्यता राजकीय वर्तुळात वर्तवण्यात येत आहेत. सुमित्रा महाजन या सलग आठ वेळा इंदूरच्या खासदार राहिल्या आहेत. मोदी सरकारच्या पहिल्या टर्ममध्ये ६ जून २०१४ ते १७ जून २०१९ पर्यंत त्या लोकसभेच्या अध्यक्षा होत्या. यंदाच्या लोकसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी वयाची ७५ वर्षे पूर्ण केल्यामुळे भाजपने त्यांना लोकसभेचे तिकीट दिले नव्हते.