Wed, Apr 01, 2020 07:22होमपेज › National › राजस्थान : २४ आप्त गमावल्‍याचं दु:ख पचवत बापनं लावलं मुलीचं लग्‍न

राजस्थान : २४ आप्त गमावल्‍याचं दु:ख पचवत बापनं लावलं मुलीचं लग्‍न

Last Updated: Feb 28 2020 2:02AM
माधोपूर : पुढारी ऑनलाईन

काल (बुधवार) राजस्थानमधील बुंदी जिल्ह्यात लग्‍नाचे वर्‍हाड घेऊन निघालेली एक बस सकाळी सवाई माधोपूर कोटा महामार्गावरील मेज नदीवरील पुलावरून नदीत कोसळली. या दुदैवी अपघातामध्ये २४ लोकांचा मृत्‍यू झाला होता. या अपघातात मृत्‍यूमुखी पडलेले सर्व लोक हे माधोपूर नीम चौकी येथील रहीवासी रमेश चंद्र यांच्या मुलीच्या लग्‍नासाठी येत होते. या घटनेची माहिती मिळताच अनेकांना धक्‍का बसला. मात्र नववधू आणि तिची आई लग्‍नाच्या तयारीमध्येचं गुंतले होते. याचे कारण म्‍हणजे, कुटुंबातील लोकांनी आई आणि मुलगीला कुटुंबातील वर्‍हाडी मंडळीच्या गाडीला अपघात झाल्‍याचे बातमी कळू दिलेले नव्हती. 

अस म्‍हटलं जातं की, जन्म, मृत्‍यू आणि लग्‍न कधी थांबत नाही. अगदी या प्रमाणेचं बुधवारी सवाई माधोपूरमध्ये घटना समोर आली. नीमचौकी शहरातील निवासी रमेश यांचे सारे कुटुंबीय आनंदात होते. मॅरेज गार्डनमध्ये सायंकाळी मुलीचे लग्‍न लागणार होते. त्‍याच्या तयारीमध्ये सर्वजण मग्‍न होते. रमेश यांची पत्‍नी दुपारपासून लग्‍नासाठी येणाऱ्या वर्‍हाडी मंडळींची वाट पाहत होती. नवरी मुलगी ही आपल्‍या मामा, मामी, आजोबा तसेच कोटावरून येणार्‍या सगळ्‍या कुटुंबाची वाट पाहात होती. इतक्‍यातच रमेश यांना माहिती मिळाली की, लग्‍नासाठी येणाऱ्या वऱ्हाडी मंडळींच्या बसला अपघात झाला आहे. बस महामार्गावरील मेज नदीच्या पुलावरून नदीमध्ये कोसळली. या अपघातामध्ये २७ पैकी २४ लोकांचा मृत्‍यू झाला आहे. ही बातमी समजताच रमेश यांच्या पायाखालची जमीनचं सरकली. मात्र लग्‍नघटिका काही वेळावर आल्‍याने त्‍यांनी स्‍वत:ला सावरत ही गोष्‍ट कोणालाही कळू दिली नाही. 

मुलगी आणि पत्‍नीला या अपघाताची माहिती नव्हती...

 मॅरेज गार्डनमध्ये ज्‍यावेळी रमेशला फोनवर या अपघाताची बातमी समजली. त्‍यावेळी लग्‍न मंडपाच्या दुसऱ्या बाजुला त्‍यांचे कुटुंबीय लग्‍नाच्या तयारीमध्ये गुंतले होते. कोणी नाचत होते. तर कोण लग्‍नाच्या विधीमध्ये गुंतले होते. रमेशची मुलगी आणि रमेश यांची पत्‍नी या दोघीही सकाळी ११ वाजता होणाऱ्या कार्यक्रमासाठी तयार झाल्‍या होत्‍या. या धामधुमीत रमेश मात्र अपघाताच्या धक्‍क्‍याने सावरले नव्हते. यावेळी सर्व कुटुंबीय लग्‍न सोहळ्यात आनंदी होते. त्‍यामुळे रमेश यांच्यासाठी मात्र एका बाजुला परिवारातील आप्तांच्या अपघाती मृत्‍यूचे दु:ख तर दुसऱ्या बाजुला मुलीच्या लग्‍नाचा क्षण या दोन्हीचे दडपण रमेश यांच्यावर होते.

आई - मुलगीला घटनेची माहिती लागू दिली नाही...

काही वेळानंतर नातेवाईकांना या अपघाताची माहिती मिळताचं सगळे रमेश यांच्याजवळ पोहोचले. यावेळी दुसऱ्या बाजुला जयपूरहून नवऱ्या मुलाची मंडळी नवरदेवासह येण्यासाठी बाहेर पडले. अशा कठीण प्रसंगी नातेवाईकांनी रमेश यांना धीर देत, मुलीचे लग्‍न लावण्याचा सल्‍ला दिला. मात्र मुलगी आणि पत्‍नीला या घटनेची माहिती कशी द्यावी याची चिंता रमेश यांना लागली होती. सर्वांनी ठरवले की, मुलगी आणि तीच्या आईला या घटनेची माहिती होउ द्‍यायची नाही. यावेळी सर्व महिलांची गर्दी बाजूला करण्यात आली. तसेच आई आणि मुलगी जवळ चार-चार समजुतदार लोकांना जवळ ठेवण्यात आले. अपघाताची माहिती असणारी कोणी व्यक्‍ती जवळ आली की, हे लोक त्‍यांना बाजुला नेण्याचे काम करत होते. 

रमेश यांची मुलगी वारंवार आपल्‍या वडिलांना (रमेश) यांना विचारत होती की, सकाळी ११ वाजता येणारी त्‍यांचे भाउ अणि मामा ३ वाजेपर्यंतही कसे काय आले नाहीत. यावर रमेश यांनी वयस्‍कर आईची तब्‍येत बिघडल्‍याने त्‍यांना कार्यक्रमाला उपस्‍थित राहता आले नाही. त्‍यामुळे सगळे कुटुंब अडकून पडले असल्‍याचे सांगितले. रमेश यांनी पत्‍नी आणि त्‍यांच्या मुलीचा मोबाईलही काढून घेतला होता. यामुळे त्‍यांचा कोणाशीही संवाद होऊ शकला नाही. 

हा कसला चेहरा...

या सर्व घडामोडीमध्ये रमेश यांना दुहेरी भूमिका बजवावी लागत होती. सकाळी या अपघाताच्या घटनेची माहिती झाल्‍यापासून सायंकाळी मुलीची पाठवणी होईपर्यंत त्‍यांची कसोटी लागली होती. त्‍यांनी कार्यक्रमात आपला चेहरा हसरा ठेवण्याचा कसोशीने प्रयत्‍न ठेवला, तर कोणी त्‍यांच्यापासून लांब गेले, की त्‍यांच्या मनाचा बांध पुन्हा फुटायचा मग एका कोपऱ्यात जाऊन ते कोणाच्या तरी खांद्यावर डोके ठेवून आपल्‍या अश्रुंना वाट मोकळी करून द्यायचे. रमेश यांच्या या धैर्याचे सर्व नातेवाईक कौतुक करत होते तर दुसऱ्या बाजूला त्‍यांचे सांत्‍वनही करत होते. 

काही दिवसांपूर्वीच मुलगा गमावला होता...

या घटनेची माहिती मिळताच माध्यमांचे प्रतिनिधी रमेश यांना भेटण्यासाठी लग्‍नाच्या हॉलमध्ये आले, त्‍यावेळी रमेश यांनी या घटनेची येथे कोणाला माहिती नाही. त्‍यामुळे त्‍यांनी सर्वांसमोर हात जोडून त्‍यांना हे लग्‍न नीट पार पाडून मला साथ देण्याची विनंती केली. यावर सर्वांनी त्‍यांच्या पाठीशी असल्‍यांचे सांगत, तेथून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. यावेळी कोणत्‍याही प्रतिनिधींने येथे शुटींग केले नाही किंवा फोटोही काढला नाही. सगळे याच काळजीत होते की, नववधू असलेली त्‍यांची मुलगी आणि बायकोला या घटनेची माहिती होता कामा नये. यावेळी रमेश म्‍हणत होते की, काही महिन्यांपूर्वीच त्‍यांच्या २० वर्षांच्या मुलाचे अकाली निधन झाले. त्‍यांना ही मुलगी आणि गेलेला मुलगा अशी दोनच अपत्‍ये आहेत. त्‍यामुळे मुलगा गेल्‍यानंतर रमेश यांनी आपल्‍या मुलीच्या आनंदासाठी काही कमी पडू दिले नव्हते. त्‍यातच मुलीच्या जीवनातील आनंदाच्या क्षणी ही दुर्देवी घटना घडल्‍याने त्‍यांच्या डोळ्यासमोर अंधार पसरल्‍याने पुढे काय करायचे हे त्‍यांना समजत नव्हते.