नवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन
मथुरेच्या खासदार आणि अभिनेत्री हेमा मालिनी यांनी विरोधकांवर निशाणा साधत शेतकरी कोणाच्या तरी सांगण्यावरून आंदोलन करत असल्याचा आरोप केला आहे. तसेच, शेतकऱ्यांनाच माहिती नाही त्यांना काय हवं आहे असे देखील हेमा मालिनी यांनी म्हटले आहे.
हेमा मालिनी यांनी ट्विट करत शेतकरी आंदोलनावर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. ''शेतकऱ्यांना अजूनही माहिती नाही की, त्यांना काय हवं आहे आणि ते कोणत्या कारणांसाठी शेती कायद्यांना विरोध करत आहेत असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.
कृषी कायद्यांच्या अंमलबजावणीला तात्पुरती स्थगिती देतानाच तोडगा काढण्यासाठी चार सदस्यीय समितीची स्थापना करण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी (दि.१२) झालेल्या सुनावणीवेळी दिला. ज्यांना प्रश्नांवर उपाय हवा आहे, त्यांनी समितीसमोर आपले म्हणणे मांडावे, असे सांगत न्यायालयाने शेतकरी संघटनांचे यावेळी वाभाडे काढले.
मात्र, सर्वोच्च न्यायालयाने कृषी कायद्यांना दिलेली स्थगिती देताना आणि नियुक्त केलेल्या चार सदस्यीय समितीवरून विरोधकांमध्ये मतभिन्नता आहे. या समितीतील चौघे सदस्य कृषी कायद्यांचे समर्थक असल्याने ते शेतकऱ्यांना न्याय देऊ शकत नाहीत, अशा शब्दांत काँग्रेसने या समितीला विरोध केला आहे.