नवी दिल्ली : पुढारी वृत्तसेवा
संघटनात्मक निवडणुका तत्काळ घेऊन अध्यक्षपदाची निवड करण्यात यावी, या मागणीवरून काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीत शुक्रवारी जोरदार खडाजंगी झाली. आनंद शर्मा, गुलाम नबी आझाद आणि पी. चिदम्बरम यांनी अध्यक्षपदाची निवड तत्काळ करण्याची मागणी केली; तर काँग्रेस कार्यकारिणी सदस्य आणि राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी या मागणीला जोरदार विरोध केला. त्यावरून जोरदार वादावादी झाली. मात्र, कोणत्याही परिस्थितीत अध्यक्षांची निवड जूनमध्ये होईल, असे पक्षाचे सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांनी बैठकीनंतर जाहीर केले.
काँग्रेस अध्यक्ष निवडीची चर्चा गेले अनेक महिने सुरू आहे. या पार्श्वभूमीवर कार्यकारी समितीची आभासी बैठक झाली. त्यावेळी अध्यक्ष निवडीबद्दलचे मतभेद उफाळून आल्याचे सूत्रांनी सांगितले. ज्येष्ठ नेते आनंद शर्मा, गुलाम नबी आझाद, पी. चिदम्बरम यांनी तत्काळ संघटनात्मक निवडणुकीची प्रक्रिया पार पाडण्याची मागणी केली. अध्यक्ष निवड झाल्यानंतर पुढील कार्यवाही करता येईल, असे शर्मा यांनी सांगितले. त्यांना मुकुल वासनिक आणि चिदम्बरम यांनी सहमती दर्शवली. त्यावर अशोक गेहलोत यांनी संताप व्यक्त करीत परिस्थितीची जाणीव असतानाही काही लोक निवडणुकीची भाषा करत आहेत. त्यांचा सोनिया गांधी यांच्यावर विश्वास नाही काय? निवडणूक झाली नाही तर काँग्रेस संपेल काय, असा संतप्त सवालही गेहलोत यांनी केला.
बंडखोरीची भाषा करणार्यांनी ते स्वत: किती वेळा निवडून येऊन मंत्री झाले? आणि कार्यकारिणीमध्ये ते किती वेळा निवडून आले, हेही सांगावे, असे आव्हान गेहलोत यांनी दिले. गेहलोत यांना ओमान चंडी, कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी पाठिंबा दिला.
पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांमुळे निवड लांबली
बैठकीतील गदारोळानंतर येत्या मे पर्यंत संघटनात्मक निवडणूक प्रक्रिया पार पाडावी. त्यानंतर जूनपर्यंत अध्यक्ष निवड करण्यात यावी, यावर सर्वांचे एकमत झाले. यासंदर्भात बोलताना वेणुगोपाल म्हणाले की, मार्च ते मे दरम्यान पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुका होत आहेत. या पार्श्वभूमीवर संघटनात्मक निवडणूक कार्यक्रमात बदल करावा, अशी विनंती सर्व सदस्यांनी हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी यांना केली. त्यानुसार जूनपर्यंत अध्यक्षपदाची निवडणूक कोणत्याही परिस्थितीत घेण्याचा निर्णय घेण्यात आला.