Mon, Mar 08, 2021 18:36
टूलकिट प्रकरण : दिशा रवीला अखेर जामीन मंजूर; शेतकरी आंदोलनाला दिला होता पाठिंबा  

Last Updated: Feb 23 2021 5:03PM

नवी दिल्ली : पुढारी वृत्तसेवा

टूलकिट प्रकरणातील आरोपी पर्यावरण कार्यकर्ती दिशा रवीला मंगळवारी पटियाला हाऊस न्यायालयाचे अतिरिक्त सत्र न्यायाधीश धर्मेद्र राणा यांनी एक लाखांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर जामीन दिला. कागदोपत्री कारवाई पूर्ण केल्यानंतर आज संध्याकाळी अथवा बुधवारी सकाळी दिशा यांची मुक्तता केली जाईल. शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ तयार केलेल्या 'टूलकिट गुगल डॉक्यूमेंट' प्रकरणाच्या तपासासंबंधी मंगळवारी दिल्ली पोलिसांच्या सायबर सेलच्या कार्यालयात दिशा पोहचली होती. या ठिकाणी निकिता तसेच शांतनू यांच्या समोर बसवून दिशाची चौकशी करण्यात आली.

टूलकिट प्रकरण : दिशा रवी, निकिता जेकब आणि शंतनू हे दिल्ली पोलिसांच्या रडारवर कसे आले?

न्यायालयाने सोमवारी रवी यांची एका दिवसाच्या पोलिस कोठडीत रवानगी केली होती. टूलकिट प्रकरणात इतर आरोपी निकिता जेकब तसेच शांतनू मुलूक यांच्या समक्ष तीची विचारपूस करण्यासाठी पोलिसांकडून तिची कोठडीची मागणी करण्यात आली होती. जेकब तसेच मुलूक सोमवारी चौकशीत सहभागी झाले होते. द्वारकातील दिल्ली पोलिसांच्या सायबर सेलच्या कार्यालयात त्यांची या प्रकरणासंबंधी विचारपूस करण्यात आली होती. पर्यावरणवादी ग्रेटा थनबर्ग कडून शेअर करण्यात आलेल्या 'टूलकिट गूगल डॉक्यूमेंट' च्या तपासाप्रकरणी दिल्ली पोलिसांनी बंगळुरूची रहिवासी दिशा रवीला अटक केली होती.

ग्रेटा थनबर्ग टूलकिट प्रकरण : कोर्टात बोलताना २१ वर्षीय दिशा रवीला का अश्रू अनावर झाले!

याप्रकरणात न्यायालयाने जेकब तसेच मुलूक यांना अंतरिम जामीन दिला आहे. शेतकरी आंदोलनाच्या नावाखाली भारतात हिंसाचार तसेच अशांतता पसरवण्याकरिता हे टूलकिट तयार करण्यात आले होते, असा आरोप पोलिसांकडून करण्यात आला आहे. केंद्र सरकारने तिन्ही शेती सुधारणा कायदे मागे घेण्याची मागणी करीत पंजाब, हरियाणा तसेच पश्चिम उत्तर प्रदेशातील शेतकरी राजधानी दिल्लीच्या विविध सीमेवर गेल्या अडीच महिन्यांपासून आंदोलन करीत आहेत. दरम्यान शांतनू मुलूक यांनी दिल्ली न्यायालयात दाखल केलेल्या जामिन अर्जावर उद्या, २४ फेब्रुवारीला सुनावणी घेण्यात येणार आहे.