Thu, Aug 06, 2020 03:48होमपेज › National › दिल्ली: ईदच्या सुरक्षा ड्युटीवर न येणारे ३६ पोलिस निलंबित

दिल्ली: ईदच्या सुरक्षा ड्युटीवर न येणारे ३६ पोलिस निलंबित

Last Updated: Aug 01 2020 4:28PM
नवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन 

बकरी ईदसाठी सुरक्षा ड्युटी लावलेली असूनही कामावर हजर न झालेल्या ३६ पोलिस शिपायाना उत्तर-पश्चिम दिल्ली विभागाच्या पोलिस उपायुक्त विजयन्ता आर्या यांनी निलंबित केले आहे. दिल्लीमध्ये कोरोनाचा प्रकोप कमी झालेला असला तरी सणासुदीच्या काळात सुरक्षा व्यवस्था मजबूत ठेवण्याचे मोठे आव्हान प्रशासन आणि पोलिस खात्यासमोर आहे. 

दिल्ली दंगलीचे प्रकरण ताजे असल्यामुळे बकरी ईदसाठी सुरक्षा व्यवस्थेची तयारी मागील काही महिन्यांपासून सुरू होती. अशातच बकरी ईदसाठी सुरक्षा ड्युटी लावलेली असूनही कामावर हजर न राहिलेल्या पोलिसांवर उपायुक्त विजयन्ता आर्या यांचा राग निघाला. ड्युटीवर हजर न राहिलेल्या ३६ पोलिसांना उपायुक्तांनी तडकाफडकी निलंबित केले. 

या पोलिस शिपायांना सकाळी पाच वाजता कामावर हजर राहायचे होते. पण ते हजर झालेच नव्हते. कोरोना संकटामुळे जामा मशिदीत आलेल्या लोकांना सामाजिक दुरत्व पाळण्याचे आवाहन करण्यात आले होते. पोलिसांनी थर्मल स्क्रीनिंग केल्यानंतरच लोकांना मशिदीत प्रवेश दिला जात होता. मशिदीत काही लोक सोशल डिस्टनसिंगचे पालन करताना दिसत होते तर काहींना त्याचे भान नव्हते.