नवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन
प्रजासत्ताक दिनानिमित्त शेतक-यांकडून काढण्यात येणाऱ्या 'किसान गणतंत्र परेड'मध्ये गडबड होण्याची शक्यता दिल्ली पोलिसांनी वर्तवली आहे. ट्रॅक्टर परेडमध्ये अव्यवस्था, संभ्रम पसरवण्यासाठी पाकिस्तानने ३०८ ट्विटर हॅण्डल बनवले आहेत, असा दावा पोलिस दलाकडून करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर पोलिसांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला. शेतकऱ्यांना काही अटींसह राजधानीत केवळ तीन ठिकाणी परेड काढण्याची परवानगी देण्यात आल्याचेही पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
सिंघू बॉर्डरवर ६२ किलोमीटरच्या मार्गासह टिकरी बॉर्डर (६३ किलोमीटर) तसेच गाझीपूरच्या ४६ किलोमीटर लांब मार्गावर ट्रॅक्टर परेड करण्याची परवानगी देण्यात आल्याची माहिती दिल्ली गुप्तचर विभागाचे विशेष पोलीस आयुक्त दीपेंद्र पाठक यांनी दिली.
कायदा सुव्यवस्थेला बाधित करण्यासाठी या ट्रॅक्टर रॅलीला लक्ष केले जाऊ शकते अशी माहिती गुप्तचर यंत्रणेच्या हाती लागली आहे. पाकिस्तानातून यांसंबंधी कात रचले जात असल्याचे पाठक म्हणाले. गेल्या दोन महिन्यापासून शेतकऱ्यांचे आंदोलन सुरु आहे. ट्रॅक्टर परेड संदर्भात शेतकरी नेत्यांसोबत आतापर्यंत सहा वेळा चर्चा करण्यात आली असेही ते म्हणाले.