नवी दिल्ली, २३ फेब्रुवारी, पुढारी वृत्तसेवा
संरक्षण मंत्रालयाने मंगळवारी ६ हजार कोटींहून अधिकच्या खर्चातून लष्कराकरीता ११८ अर्जुन एमके-१ ए टँक खरेदीला मंजुरी दिली आहे. ५८ टन वजनी हे टँक संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने (डीआरडीओ) विकसित केले आहे. टँकच्या करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्यानंतर ३० महिन्यांच्या आता हे टँक लष्करात दाखल होतील, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. संपूर्ण स्वदेशी बनावटीच्या या टँकच्या आरेखनासंबंधीचा विकास तसेच मॅन्युफॅक्चरिंगचे काम देशांतर्गतच करण्यात आले आहे, हे विशेष.
अर्जुन टँक मध्ये ७१ मोठे बदल केल्यानंतर एमके-१ए तयार करण्यात आले आहे. अत्यंत वेगाने लक्षाचा पाठलाग करण्यात टँक सक्षम आहे. दिवस-रात्र, प्रत्येक मोसमात लक्षावर अचूक निशाणा साधण्यात टँक सक्षम आहे. टँकमध्ये दोन ट्रान्समिशन सिस्टम लावण्यात आली आहे. युद्धात जास्तीत जास्त अंतरावर असलेल्या शत्रुदेशाच्या लष्करतळाला उद्धवस्त करण्याची क्षमता अर्जुन एमके-१ए मध्ये आहे.
ग्रॅनेड तसेच मिसाईल हल्ल्याचा टँकवर कुठलाही परिणाम होणार नाही. शिवाय रासायनिक हल्ल्यापासून बचाव करण्यासाठी टँकमध्ये विशेष सेंसर लावण्यात आले आहेत. गेल्या काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चेन्नईत लष्करप्रमुख जनरल एमएन नरवाणे यांना अर्जुन टँक चे मार्क-१ ए वर्जन सुपूर्द केले होते.