होमपेज › National › दिल्ली : दोन मुलांची हत्या करून दांपत्याची आत्महत्या

दोन मुलांची हत्या करून दांपत्याची आत्महत्या

Last Updated: Dec 03 2019 3:36PM
नवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन

इंदिरापुरममधील वैभवखंड येथील कृष्णा अप्रा सफाईरा सोसायटीमध्ये एका जोडप्याने आपल्या दोन मुलांची हत्या करून सोसायटीच्या ८ व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मृत मुले ही जवळपास १४ ते १८ वर्षांची होती. मुलांची हत्या व दांपत्याच्या आत्महत्ये मागे आर्थिक कारण असल्याचे सुसाईड नोटद्वारे समोर आले आहे. पोलिसांनी याची माहिती दिली आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, घटनेतील मृताचे नाव गुलशन असून तो एक व्यवसायिक होता. त्याचे दोन विवाह झाले होते. गुलशनच्या पहिल्या पत्नीचे नाव परवीन आणि दुस-या पत्नीचे नाव संजना होते. संजना ही गुलशनच्या व्यावसायात भागीदार होती. गुलशनला एक मुलगा व एक मुलगी होती. दांपत्यांनी आत्महत्येपूर्वी हृतिक (वय १४) आणि कृतिका (१८) यांची हत्या केली व त्यानंतर सोसायटीच्या आठव्या मजल्यावरून उडी घेवून स्वत:ची जीवनयात्रा संपविली. पोलिसांना फ्लॅटमध्ये एक ससा देखील मृतावस्थेत आढळला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आत्महत्येपूर्वी गुलशनने हृतिकचा गळा आवळून आणि त्यानंतर चाकूने वार केले. तर, यानंतर कृतिकाची हत्या केली. हृतिक हा डीएव्ही शाळेत ९ वीच्या वर्गात शिकत होता. तर कृतिका ही फॅशन डिझायनिंगचा कोर्स करत होती. कृतिकाच्या मित्रांनी सांगितले की, 'रात्री तिचा आणि तिच्या आईचा फोन बंद होता. सकाळी पोलिसांनी फोन उचलल्यावर या घटनेची माहिती मिळाली.' गुलशनने रविवारी अपार्टमेंटमधील सर्व सुरक्षा रक्षकांच्या कुटुंबियांना ब्लँकेट वाटप केले होते. 

या घटनेची माहिती मिळताच गाझियाबादचे पोलिस घटनास्थळी पोहोचले. पोलिसांना तेथे भिंतीवर एक सुसाईड नोट आणि ५०० रूपयांच्या नोटा चिकटवल्याचे आढळले. शिवाय भिंतींवर काही बाउन्स धनादेश ही चिकटवले होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुसाईड नोटमध्ये या आत्महत्येसाठी आपल्या मेहुण्याला जबाबदार धरावे असे लिहिले आहे. मृताच्या भावाने असा आरोप केला की, 'माझा भाऊ आणि मेव्हण्या यांच्यात २ कोटी रुपयांच्या व्यवहाराचा वाद झाला होता ज्यामुळे त्याने आत्महत्या केली.'

गुलशनने सुसाईड नोटमध्ये एकत्र अंत्यसंस्कार करण्याची ईच्छा व्यक्त केली आहे. याशिवाय राकेश वर्मा नावाच्या व्यक्तीवर आरोप करण्यात आला आहे. तो त्याचा नातेवाईक आहे.