Fri, May 07, 2021 19:24
कोरोनीलमुळे कोरोना गेला म्हणणाऱ्या बाबा रामदेवांच्या कुटीत ८३ पॉझिटिव्ह

Last Updated: Apr 23 2021 12:33PM

हरिद्वार : पुढारी ऑनलाईन

उत्तराखंडमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढताना पाहायला मिळतोय. कोरोनाने आता पंतजली योगपीठातही धडक दिली आहे. हरिद्वारमधील पतंजली योगपीठातील ८३ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. मात्र, बाबा रामदेव यांच्या प्रवक्त्याने हे वृत्त फेटाळले आहे. 

पतंजली योगपीठाच्या अनेक संस्थांमध्ये कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून येत आहेत. हरिद्वारचे सीएमओ डॉक्टर शंभू झा यांनी दिलेल्या माहितीनुसार १० एप्रिलपासून आतापर्यंत पतंजली योगपीठ आचार्यकुलम आणि योग ग्राममध्ये ८३ लोक कोरोना पॉझिटिव्ह आढळून आलेत. यामध्ये ४६ पतंजली योगपीठ, २८ योग ग्राम आणि ९ आचार्यकुलम यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. या सर्वांना योगपीठाच्या परिसरातच विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. गरज भासल्यास रामदेव बाबा यांचीही कोरोना चाचणी करण्यात येईल, असेही झा यांनी सांगितले आहे.

या घटनेनंतर सोशल मीडियावर बाबा रामदेव यांनी मागील वर्षी कोरोना महामारीत लाँच केलेल्या कोरोनील औषधाला ट्रोल करण्यात येत आहे. 

दरम्यान, उत्तराखंडात आयोजित करण्यात कुंभमेळ्यात कोरोनाचा शिरकाव झाला आहे. कुंभमेळ्यात सहभागी झालेल्या शेकडो साधू, संत, भाविकांना कोरोनाची लागण झाली होती. गेल्या काही दिवसांपासून उत्तराखंडमधील कोरोनाबाधितांची संख्या वाढत असल्याचे पाहायला मिळत आहे. राज्यात निर्बंध लावण्यात आले असून, गुरुवारी १९ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. आताच्या घडीला उत्तराखंडात सुमारे २७ हजार रुग्ण कोरोनावर उपचार घेत असल्याची माहिती मिळाली आहे.