Wed, Jan 20, 2021 08:49होमपेज › National › राजधानी दिल्लीतील कोरोनामुक्तीचा दर ७२ टक्के! 

राजधानी दिल्लीतील कोरोनामुक्तीचा दर ७२ टक्के! 

Last Updated: Jul 07 2020 4:23PM
नवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन 

राजधानी दिल्लीतील कोरोनाबाधितांच्या संख्येने १ लाखांचा टप्पा ओलांडला आहे. पंरतु, राज्यात सर्वाधिक कोरोनामुक्तीचा दर नोंदवण्यात आला आहे. दिल्लीतील ​स्थिती त्यामुळे हळुहळू सुधारत असल्याचे दिसून आले आहे. 

विशेष म्हणजे १५ हजारांहून अधिक कोरोनाग्रस्तांना घरगुती विलगिकरणात ठेवूनच उपचार दिले जात आहेत. महाराष्ट्र, तामिळनाडू पाठोपाठ​ १ लाखांहून अधिक कोरोनाबाधित असलेले तिसरे राज्य दिल्ली ठरले आहेत. 

राज्यातील ७२ हजारांहून अधिक कोरोना बाधितांनी संसर्गावर मात मिळवली आहे. दिल्लीतील कोरोनामुक्तीचा दर त्यामुळे ७२ टक्के नोंदवण्यात आला आहे. 

गेल्या काही दिवसांमध्ये दिल्लीतील कोरोनाबाधितांची संख्या कमी होत असल्याचे दिसून आले आहे. सध्या राज्यात दर १०० कोरोना तपासणी पैकी १० नागरिक पॉझिटिव्ह आढळत आहेत.

कोरोना बाधित आढळण्याचे प्रमाण २६ वरून १० टक्क्यांपर्यंत घसरला आहे. देशातील पाच सर्वाधिक कोरोना प्रभावित राज्यांचा विचार केला, तर राजधानीत कोरोना मुक्तीचा दर इतर राज्यांच्या तुलनेत सरस आहे. दिल्लीसह गुजरातमध्येही हा दर ७२ टक्के नोंदवण्यात आला आहे. सर्वाधिक कोरोनाग्रस्तांच्या मृत्यूचे प्रमाण गुजरातमध्ये, तर सर्वात कमी तामिळनाडूत नोंदवण्यात आले आहे.

५ हजार कोरोनाग्रस्त रुग्णालयात

दिल्लीतील २५ हजार ६२० कोरोना बाधितां पैकी केवळ ५ हजार १०० रुग्णांवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. १ हजार ७२५ कोरोना केंद्रात, १४८ रुग्ण हे हेल्थ सेंटरमध्ये आहेत. सर्वाधिक १५ हजार ५६४ रुग्ण घरगुती विलगिकरणात आहेत. 

दिल्लीत आतापर्यंत ६ लाख ५० हजारांहून अधिक नागरिकांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे. गेल्या १५ दिवसांपासून दररोज सरासरी २० हजारांच्या घरात नागरिकांच्या तपासण्या करण्यात येत आहे. लोकसंख्येच्या अनुषंगाने दिल्लीत देशातील सर्वाधिक कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत. 

कोरोनामुक्तीच्या दरात सुधारणा

दिनांक        तपासण्या     कोरोनामुक्ती     संसर्ग दर
२८ जून         १७,१७९         ६५ %        १४.३८
३० जून        १८,१७९        ६७%        १२.८०
१ जुलै        १९,५५६        ६७%        १२.२३
२ जुलै        २०,८२२        ६८.७%        १२.३३
३ जुलै        २४,१२४        ६९%        ११.०
४ जुलै        २३,६७३        ७०.२२%        ११.३
५ जुलै        २३,०४६        ७१.७%        ९.८

सर्वाधिक कोरोना प्रभावित राज्यातील कोरोनामुक्तीचा दर

राज्य        कोरोनामुक्तीचा दर
महाराष्ट्र        ५४.३७
तमिलनाडू        ५६ 
दिल्ली            ७२ 
गुजरात            ७२ 
उत्तरप्रदेश        ६८