Sat, Oct 31, 2020 09:36होमपेज › National › कोरोनावर मात करूनही पुन्हा लागण झाल्याने चिंतेत वाढ?

कोरोनावर मात करूनही पुन्हा लागण झाल्याने चिंतेत वाढ?

Last Updated: Sep 06 2020 9:02PM
बंगळूर : पुढारी ऑनलाईन 

बंगळूरमध्ये पहिल्यांदाच कोरोनामुक्त झालेल्या तरुणीला पुन्हा कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. 27 वर्षीय या तरुणीला जुलैमध्ये कोरोनाची लागण झाली होती. तिला सौम्य स्वरुपाची लक्षणे होती. त्यातून ती पूर्ण बरी झाली होती. फोर्टिस रुग्णालयाने हे अधिकृत वक्तव्य प्रसिद्ध केले आहे. या वक्तव्यात या रुग्णांच्या शरिरात कोरोना विषाणू विरुद्ध लढण्यासाठीच्या अँटीबॉडि्ज तयारच झालेल्या नसल्याचे सांगण्यात आले. 

फोर्टिस रुग्णालयातील साथरोग सल्लागार डॉ. प्रतिक पाटील यांनी 'अशा प्रकारची पुन्हा कोरोनाची लागण झाल्याची ही बंगळूरमधील कदाचित पहिलीच केस आहे.' या युवतीला एका महिन्याच्या अंतराने पुन्हा कोरोनाची लागण कशी झाली हेही या डॉक्टरांनी  सांगितले. 

ते म्हणाले की, 'साधारणतः लागण झालेल्या केसमध्ये 2 ते 3 आठवड्यानंतर कोव्हिड इम्युनोग्लोब्युलिन जी अँटी बॉडी चाचणी पॉझिटिव्ह येते. यावरुन रुग्णामध्ये कोरोना विरुद्ध लढण्यासाठीचे सेल तयार झालेत असा निष्कर्ष निघतो. पण, या रुग्णामध्ये ही चाचाणी निगेटिव्ह आली होती. याचा अर्थ पहिल्या संसर्गात तिच्यात कोरोनाविरुद्ध लढण्यासाठीची प्रतिकारशक्ती तयार झाली नव्हती. दुसरी शक्यता म्हणजे तयार झालेल्या अँटी बॉडी या महिन्याभरात नाहीशा झाल्या. त्यामुळे तिला पुन्हा कोरोनाची लागण झाली.' तसेच डॉ. पाटील यांनी तिला पुन्हा झालेल्या संसर्गाची लक्षणे ही सौम्य स्वरुपाची असल्याचे सांगितले. 

डॉ. पाटील यांनी 'पुन्हा संसर्ग झाल्याची केस म्हणजे प्रत्येकाच्या शरिरात अँटीबॉडीज तयार होतातच असे नाही किंवा जरी त्यांच्यात त्या अँटी बॉडीज तयार झाल्या होत्या पण त्या जास्त काळ टिकल्या नाहीत. त्यामुळे पुन्हा विषाणू शरिरात प्रवेश करतात.' असा निष्कर्ष काढला. 

या निष्कर्षामुळे कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखणे आणि कोरोनाची महामारी संपुष्ठात आणण्याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. भारतात कोरोनाचा उद्रेक सुरुच असून सध्या एका दिवसात 90 हजाराच्या आसपास नवे कोरोना बाधित रुग्ण आढळून येत आहेत. 

या नव्या निष्कर्षामुळे कोरोनावरील लस किती काळ प्रभावी राहू शकते याबाबतही साशंकता निर्माण झाली आहे. असे असले तरी भारतातील आणि इतर देशातील शास्त्रज्ञांनी कोरोनाची पुन्हा लागण होण्याच्या घटना या दुर्मिळ आहेत त्यामुळे आताच सतर्कतेचा इशारा देण्याचे कारण नाही. हर्ड इम्युनिटी कोरोना महामारी रोखण्यासाठी प्रभावी नाही असा दावा करण्यासाठी अधिक अभ्यास होण्याची गरज आहे. 

कोरोनाची पुन्हा लागण होण्याच्या घटना तेलंगाणा आणि महाराष्ट्रात घडल्या आहेत तर अशाच प्रकारच्या घटना हाँग काँग, अमेरिका, नेदरलँड आणि बेल्जियममध्येही अशाच घटना घडल्या आहेत. 

 "