Mon, Aug 03, 2020 14:51होमपेज › National › लडाखमध्ये भारत- चीन सैनिक पुन्हा एकमेकांना भिडले!

लडाखमध्ये भारत- चीन सैनिक पुन्हा एकमेकांना भिडले!

Published On: Sep 12 2019 12:43PM | Last Updated: Sep 12 2019 12:43PM

संग्रहित छायाचित्रलडाख : पुढारी ऑनलाईन

पाकिस्तान बरोबर तणावाचे वातावरण असताना भारत आणि चीनचे सैनिक पूर्व लडाख भागात एकमेकांना भिडले. यावेळी भारत आणि चीनच्या सैनिकांत धक्काबुक्की झाली. हा प्रकार काल, मंगळवारी पँगोंग सरोवरच्या उत्तर किनारी भागात घडला आहे. येथील एक तृतीयांश भाग चीनच्या नियंत्रणाखाली आहे. मात्र, दोन्ही बाजूंच्या प्रतिनिधीमंडळ स्तरावर झालेल्या चर्चेनंतर तणाव कमी झाला. याबाबतचे वृत्त टाईम्स ऑफ इंडियाने दिले आहे.

याबाबत सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भारतीय सैनिक गस्त घालत असताना त्यांचा सामना चीनच्या पीपल्स लिब्रेशन आर्मीच्या सैनिकांशी झाला. येथे चिनीच्या सैनिकांनी भारतीय सैनिकांनी गस्त घालण्यास विरोध केला. त्यानंतर दोन्ही बाजूंकडील सैनिकांमध्ये धक्काबुक्की झाली. त्यानंतर दोन्ही देशांनी या भागात सैन्य सुरक्षा वाढविली आहे.

तणाव कमी करण्यासाठी दोन्ही देशांच्या सैन्यांनी द्विपक्षीय ब्रिगेडियर स्तरावरील अधिकाऱ्यांच्या चर्चेसाठी सहमती दर्शवली आहे. याबाबत एका अधिकाऱ्याने म्हटले आहे की, लाइन ऑफ ॲक्चुअल कंट्रोलच्या (एलएसी) स्थितीवरून दोन्ही देशांमध्ये मतभिन्नता आहे. यामुळे अशा घटना वारंवार घडत आहेत. यावर बॉर्डर पर्सनल मीटिंग अथवा प्लॅग मीटिंगद्वारे तोडगा काढला जातो.

पँगोंग सरोवरच्या उत्तर किनारी भागात ५ ऑगस्ट २०१७ रोजी देखील दोन्ही देशांच्या सैन्यांमध्ये धक्काबुक्की झाली होती. त्यावेळी दगड आणि रॉडचा वापर झाला होता. त्याच वर्षी सिक्किम-भूतान सीमेवर डोकलाम येथे दोन्ही सैन्यांमध्ये तणाव निर्माण झाला होता. तब्बल ७३ दिवस एकमेकांसमोर उभे ठाकल्यानंतर सैनिक मागे हटले. आता पुन्हा धक्काबुक्कीचा प्रकार घडला आहे.