Wed, May 12, 2021 00:39
दिल्लीकर नागरिकांना दोन महिने मोफत अन्नधान्य मिळणार

Last Updated: May 04 2021 2:40PM

नवी दिल्ली : पुढारी वृत्तसेवा

देशाची राजधानी दिल्लीत कोरोनाचे संकट कायम असल्याच्या पार्श्वभूमीवर दिल्ली सरकारने येथील नागरिकांना दोन महिन्यांच्या कालावधीसाठी मोफत अन्नधान्य देण्याचा निर्णय घेतला आहे. याशिवाय टॅक्सी आणि रिक्षाचालकांना प्रत्येकी पाच हजार रुपयांची मदत दिली जाणार असल्याची माहिती मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत बोलताना दिली.

दिल्लीत 72 लाख लोकांकडे रेशनकार्ड असून या लोकांना दोन महिन्यांच्या कालावधीसाठी मोफत अन्नधान्य दिले जाणार आहे. याशिवाय दीड लाख टॅक्सी तसेच रिक्षाचालकांना प्रत्येकी पाच हजार रुपयांची मदत दिली जाणार आहे. दोन महिने धान्य दिले जाणार आहे, याचा अर्थ दोन महिने लॉकडाउन लागणार, असा होत नाही, असे स्पष्ट करून केजरीवाल पुढे म्हणाले की, परिस्थिती लवकर सुधारावी आणि जनजीवन सुरळीत व्हावे, अशी सरकारची इच्छा आहे. दिल्लीतील कोरोनाचे संकट भीषण असून जे लोक इतरांना मदत करू शकतात, त्यांनी तशी मदत अवश्य करावी. कुणाला जेवण पोहोचवयाचे असेल, कुणाला ऑक्सिजन, बेड, सिलेंडर अथवा अन्य कोणतीही गरज असेल तर तशी मदत केली जावी.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने दिल्लीला अक्षरशः पिळवटून टाकले आहे. मागील काही दिवसांपासून शहरात दैनिक रूग्ण संख्या 20 हजारांच्या आसपास येत आहे. मृतांचा आकडादेखील भयावह आहे. गेल्या चोवीस तासात दिल्लीत चारशेपेक्षा जास्त लोकांचा कोरोनाने बळी घेतला होता.