नवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन
चीनचे अध्यक्ष शी. जिनपिंग यांच्या भारत दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर चीनमधील माध्यमांनी भारत आणि चीनमधील मैत्रिपूर्ण संबंध महत्वपूर्ण असल्याचे म्हटले आहे. दोन्ही देश मिळून २१ वे शतक घडवू शकतात आणि हे शतक आशिया खंडाचे असेल, असे चीनचे सरकारी वृत्तपत्र ग्लोबल टाईम्सने म्हटले आहे.
आशियातील अनेक नेते आणि रणनितीकार सांगतात की, १९ वे शतक युरापचे, २० वे शतक अमेरिकेचे आणि आता २१ वे शतक आशियाचे असेल. ग्लोबल टाईम्सने भारतीय थिंक टँक ऑर्ब्जवर रिसर्च फाउंडेशनचा एका अहवालाचा हवाला देत चीन आणि भारताच्या आर्थिक प्रगतीमुळेच आशिया खंडाची प्रगती शक्य असल्याचे नमूद केले आहे.
शी. जिनपिंग यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबरोबर होणारी दुसरी बैठक महत्वपूर्ण असल्याचे सांगत चिनीमधील माध्यमांनी, दोन्ही देशांदरम्यानचे द्विपक्षीय संबंध नव्या उंचीवर पोहोचतील, अशी आशा व्यक्त केली आहे. भारतासोबतच्या आर्थिक सहकार्याचा संदर्भ देत माध्यमांनी म्हटले आहे की, चिनी कंपन्यांनी गेल्या काही वर्षांत भारताच्या मेक इन इंडिया आणि डिजीटल इंडिया सारख्या अभियानाचा हिस्सा होत गुंतवणूक वाढवली आहे. त्याचबरोबर भारतीय कंपन्यांनी चीनमध्येही गुंतवणूक वाढवली आहे.
दरम्यान, चीनमधील माध्यमांनी भारतावर चीनवरती अविश्वास दाखविल्याचा आरोप केला आहे. भारताकडून शंका घेतली जात असल्याने दोन्ही देश आर्थिकदृष्ट्या एकत्र प्रगती करू शकत नसल्याचेही त्यांनी म्हटले आहे.