Thu, Jul 02, 2020 20:55होमपेज › National › चांद्रयान-२ : अखेर 'विक्रम लँडर' सापडले 

चांद्रयान-२ : अखेर 'विक्रम लँडर' सापडले 

Last Updated: Dec 03 2019 9:27AM

चांद्रभूमीवरील विक्रम लॅँडरचे अवशेष. (नासाच्या ऑर्बिटरने टिपलेले छायाचित्र)नवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन

भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात इस्रोची चांद्रयान-२ मोहीम अखेरच्या टप्प्यात अयशस्वी ठरली. ७ सप्टेंबर रोजी लँडिंगपूर्वी केवळ ६९ सेकंदांआधी चांद्रयान-२ च्या विक्रम लँडरचा संपर्क तुटला. विक्रम लँडरचे चांद्रभूमीवर सॉफ्ट लँडिंग न होता हार्ड लँडिंग झाल्याने ते निष्क्रिय झाले होते. गेल्या काही दिवसांपासून चांद्रभूमीवर विक्रम लँडरचा ठावठिकाणा शोधला जात होता. मात्र, अखेर अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था नासाने विक्रम लँडरचा ठावठिकाणा शोधून काढला आहे. नासाच्या ऑर्बिटरला चांद्रभूमीवरील विक्रम लँडरचे अवशेष सापडले असून त्याची काही छायाचित्रे टिपली आहे. ही छायाचित्रे नासाने ट्विटरच्या माध्यमातून शेअऱ केली आहेत.

विक्रम लँडरचे ज्या ठिकाणी हार्ड लँडिंग झाले; ते ठिकाण आणि त्याचे अवशेष याची छायाचित्रे नासाच्या ऑर्बिटरने टिपली आहेत. छायाचित्रातील हिरवे ठिपके विक्रम लँडरचे अवशेष दर्शवितात. तीन मोठे तुकडे आढळून आले असून ते प्रत्येकी २x२ पिक्सेलचे आहेत, अशी माहिती नासाने दिली आहे.

नासाच्या ऑर्बिटरने चांद्रभूमीच्या पृष्ठभागावर विक्रम लँडर उतरण्यापूर्वीची आणि उतरल्यानंतरची छायाचित्रेही प्रसिद्ध केली आहेत.  

विशेष म्हणजे नासाने विक्रम लँडरचा ठावठिकाणा शोधण्याचे श्रेय तामिळनाडूतील मदुराईतील मेकॅनिकल इंजिनिअर आणि कंप्यूटर प्रोग्रामर शनमुगा सुब्रमण्यम यांना दिले आहे. Nasa's Moon's Lunar Reconnaissance Orbiter (LRO) ने १७ सप्टेंबर, १४ आणि १५ ऑक्टोबर तसेच ११ नोव्हेंबर रोजी चंद्राच्या पृष्ठभागावरील छायाचित्रे टिपली होती. याचा शनमुगा सुब्रमण्यम यांनी आठवडाभर अभ्यास करुन विक्रम लँडरचे अवशेष ओळखले आणि याची माहिती त्यांनी नासाला दिली. नासाने याची पुष्टी करण्यासाठी थोडा वेळ घेतला. त्यानंतर सुब्रमण्यम यांनी घेतलेला शोध खात्रीलायक असल्याचे नासाने जाहीर केले.

इस्रो ७ सप्टेंबरला इतिहास रचणार होता; पण लँडिंगपूर्वी केवळ ६९ सेकंदांआधी चांद्रयान २ च्या विक्रम लँडरचा संपर्क तुटला होता.'चांद्रयान २' ही इस्रोची अतिशय महत्त्वाची मोहीम होती. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावरील भागाचा अभ्यास करण्यासाठी ऑर्बिटर, लँडर आणि रोव्हर एकत्र पाठवण्यात आले होते. मात्र, विक्रम लँडरचा चांद्रभूमीवर उतरण्यापूर्वी संपर्क तुटला होता.