Tue, Jun 15, 2021 13:41
केंद्र सरकार लशींच्या दोन डोस दरम्यान अंतर वाढण्याच्या तयारीत; विचारविमर्श करण्याकरीता तज्ज्ञ समितीची नेमणूक 

Last Updated: May 07 2021 3:27PM

नवी दिल्ली : पुढारी वृत्तसेवा 

कोरोना महारोगराई विरोधातील युद्धात महत्वाची ढाल असलेल्या लशींवर जगभरात सातत्याने अध्ययन केले जात आहे. या अभ्यासाच्या आधारावर कोरोना लशीच्या वापरासंबंधी निर्णय घेतले जात आहेत. अशात केंद्र सरकार ऑक्सफर्ड-एस्ट्राजेनेकाच्या कोरोना लसीच्या दोन डोज दरम्यानचा कालावधी वाढवण्याचा निर्णय घेण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

वाचा : देशात प्रत्येक तासाला १५० रुग्णांचा मृत्यू

यासंबंधी विचारविमर्श करण्यासाठी सरकारने एक तज्ज्ञ समितीची नेमणूक केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. दोन डोज मधील वाढीव कालावधीमुळे लसीचा प्रभाव वाढतो, या अभ्यासावर समितीकडून विचार केला जात आहे. पुढील आठवड्यापर्यंत केंद्र सरकारकडे समितीकडून अहवाल सादर केला जाईल, अशी माहिती समोर आली आहे. 

पुण्याच्या सीरम इंस्टीट्यूट ऑफ इंडियाने अगोदरच एप्रिल महिन्यात कोविशील्डच्या दोन डोसमधील अंतर ४ ते ६ आठवड्यांनी वाढवून ६ ते ८ आठवड्यांपर्यंत केले आहे. कोविशील्डचा दूसरा डोस १२ आठवड्यांनी देण्यात आला तर ती अधिक प्रभावी ठरते, असे निष्कर्ष मार्चमध्ये नामांकित हेल्थ जर्नल लांसेटमध्ये प्रकाशित झालेल्या एका रिपोर्ट मध्ये काढण्यात आले होते.

१२ आठवड्यांच्या कालावधीनंतर लस ८१ टक्क्यांपर्यंत प्रभावी 

अभ्यासाअंती कोविशील्ड डोस ६ आठवड्यांहून कमी अंतरादरम्यान दिला गेला तर त्याचा प्रभाव ५५.१ टक्के दिसून येतो. तर, हेच अंतर १२ आठवड्यांचे राहिले तर लशीचा प्रभाव ८१.३ टक्क्यांपर्यंत दिसून येतो. लशीचा पहिला आणि दूसरा डोस दरम्यान किमान एक महिन्याचे अंतर ठेवले तर लसीचा प्रभाव ९० टक्क्यांपर्यंत होतो, असे निष्कर्ष ब्राझील तसेच ब्रिटनमध्ये करण्यात आलेल्या अभ्यासाअंती काढण्यात आले होते. 

लसीकरणादरम्यान अंतर वाढल्यास दोन पातळीवर फायदा 

कोव्हिशील्ड लशीच्या दोन डोस दरम्यान अंतर वाढवण्यात आले तर भारतात याचा दोन पातळीवर फायदा होईल. डोस मधील वाढीव अंतरादरम्यान लशीचा पुरवठा वाढल्यानंतर किंमतीत घट होईल. दुसऱ्या डोस करीता लोकांची गर्दी कमी झाली, तर मोठ्या प्रमाणात नागरिकांना पहिला डोज दिला जावू शकतो. अनेक देशांनी लसीकरणादरम्यान तीन महिन्यांचे अंतर ठेवले आहे, त्यामुळे जास्तीत जास्त लोकसंख्येला लसीकरण करणे शक्य होईल. 

वाचा : जगातील पाचपैकी एक सक्रिय रूग्ण भारतात

वाचा : तामिळनाडूच्या मुख्यमंत्रीपदी एम. के. स्टॅलिन