नवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन
संपूर्ण जगावर सध्या कोरोनाचे संकट आहे. जगातील बहुतांश देश कोरोनाच्या गंभीर परिस्थितीचा सामना करत असताना एका दिलासादायक बातमी समोर आली आहे. भारतात कोरोनावरील पहिली लस तयार करण्यात आली आहे. ही लस भारत बायोटेकने विकसित केली आहे. इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (आयसीएमआर), नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी (एनआयव्ही) यांच्या सहकार्याने भारत बायोटेकने भारतात पहिली लस यशस्वीरित्या विकसित केल्याचा दावा केला आहे.
वाचा : उत्तर प्रदेश : डॉक्टरांनी स्पर्शही केला नाही; मुलाच्या मृतदेहाला कवटाळून बापाचा रुग्णालयात आक्रोश
''कोवॅक्सिन' असे या लसीचे नाव असून ती संपूर्ण देशी पद्धतीची आहे. या लसीचा मनुष्यावर दोन टप्प्यांत प्रयोग करण्यासाठी ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाने (डीसीजीआय) परवानगी दिली आहे. मनुष्यावरील करण्यात येणाऱ्या क्लिनिकल ट्रायल्सला येत्या जुलैमध्ये सुरुवात होईल, असे भारत बायोटेकने म्हटले आहे.
भारत बायोटेक ही हैदराबादमधील फार्मा कंपनी आहे. या कंपनीने कोरोनावरील भारतातील पहिली लस विकसित केल्याचा दावा केला आहे. भारत बायोटेकचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. कृष्णा एला यांनी म्हटले आहे की, लसीबाबत केलेल्या पूर्वानुमान अभ्यासाचे निकाल आश्वासक आहेत. यातून व्यापक सुरक्षा आणि प्रभावी रोगप्रतिकारक शक्ती दिसून आली.
देशात पहिल्यांदाच अशा प्रकारे लसीला मनुष्य चाचणीला परवानगी देण्यात आली आहे. जुलै महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यापासून लसीवर चाचणीस सुरुवात करण्यात येणार आहे. पहिल्या टप्यात १५० तसेच दुसऱ्या टप्प्यात १० हजार मनुष्य चाचणी घेण्यात येणार असल्याचे समजते.
वाचा : नियंत्रण क्षेत्राबाहेर हॉटेल्स, मॉल्स ८ जुलैपासून
सार्स-कोव्ही-२ स्टेन विलग करण्यात आल्यानंतर ते भारत बायोटेककडे सुपूर्द करण्यात आले होते, अशी माहिती समोर आली आहे. भारत बायोटेककडून निर्मित करण्यात आलेली ही भारतातील पहिली लस ठरली आहे. पहिल्या तसेच दुसऱ्या टप्यातील चाचणीचे निष्कर्ष समोर आल्यानंतर डिसेंबरपर्यंत लस उपलब्ध होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.